गणेश मंडळांची ५ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी : विधायक उत्सवासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:43 AM2018-09-04T00:43:30+5:302018-09-04T00:43:49+5:30
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हा उद्देश ठेवून यंदाच्या वर्षीपासून गणेश मंडळांना आपल्या वर्गणीतील किमान पाच टक्के रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसुविधांसाठी खर्च करावी लागणार आहे.
इंदूमती गणेश ।
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हा उद्देश ठेवून यंदाच्या वर्षीपासून गणेश मंडळांना आपल्या वर्गणीतील किमान पाच टक्के रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसुविधांसाठी खर्च करावी लागणार आहे. यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला असून, त्यांच्याकडे दहावी-बारावीला ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या दोनशे विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज केले आहेत.
गणेशोत्सवाला आता १३ दिवस राहिल्याने केवळ गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची तात्पुरत्या नाव नोंदणीसाठी झुंबड उडाली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात नाव नोंदणीसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची होणारी गर्दी, त्यामुळे कार्यालय व पोलिसांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गेल्या वर्षीपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्वत: पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम करण्याला प्राधान्य दिले आहे. त्या अंतर्गत सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आता गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना उत्सवातील एकूण वर्गणीच्या किमान पाच टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी वापरण्यास सांगितले आहे. या उपक्रमात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचाही सहभाग असणार आहे.
कार्यालयाने इयत्ता दहावी व बारावीत किमान ८५ टक्के गुण मिळविलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक मदतीसाठीचे अर्ज मागविले आहेत. कार्यालयाकडे आठ दिवसांत २०० विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज केला आहे. गणेशोत्सवादरम्यान या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक मंडळाकडे एक-दोन विद्यार्थ्यांच्या त्यावर्षीच्या शिक्षणासाठी लागणाºया निधीची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मंडळांनी उत्सवासाठी जमा झालेल्या देणगीतून या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करायची आहे; त्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
धर्मादाय कार्यालयाच्यावतीने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांनी जमलेल्या रकमेतील किमान पाच टक्के रक्कम गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे.
- शिवराज नाईकवडे (अधीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय)