लाॅकडाऊन नियमभंग करणाऱ्यांना ५ लाख १४ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:58+5:302021-05-22T04:23:58+5:30
कोल्हापूर : कडक लाॅकडाऊन असतानाही नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. यात मास्क न घालणे, ...
कोल्हापूर : कडक लाॅकडाऊन असतानाही नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर शुक्रवारी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. यात मास्क न घालणे, माॅर्निंग वाॅक, आस्थापना उघडी ठेवणे, विनाकारण फेरफटका मारणे आदी कारणांवरून ५लाख १४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर १५८ वाहने जप्त केली.
जिल्ह्यात दिवसभरात पोलिसांनी ४५७ जणांकडून मास्क न घातल्याबद्दल १ लाख १५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला, तर विनाकारण फिरणाऱ्या ८६७ वाहनधारकांवर २ लाख ११ हजार १०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. शुक्रवारी सकाळी जिल्हाभरात माॅर्निंग वाॅक करणाऱ्या ३८३ जणांनाही कारवाईचा हिसका दाखविण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १ लाख ६७ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. आस्थापना उघडी ठेवल्याबद्दल १५ जणांकडून २० हजार ५०० रुपयांचा असा एकूण ५ लाख १४ हजारांचा दंड वसूल केला. विनाकारण फिरून नियमभंग केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई शनिवारी आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.