कोल्हापूर विभागात ५ लाख खातेदारांना १०९२ कोटींची कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 06:54 PM2018-02-28T18:54:23+5:302018-02-28T18:54:23+5:30
राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या सहा याद्यांचा जमा-खर्च पूर्ण झाला असून कोल्हापूर विभागातील ५ लाख ९ हजार ३९५ खातेदारांना १०९२ कोटी ४८ लाख ८७ हजार ९०५ रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत झाली आहे. सर्वाधिक १ लाख ७६ हजार खातेदारांना ३५२ कोटींची कर्जमाफी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या सहा याद्यांचा जमा-खर्च पूर्ण झाला असून कोल्हापूर विभागातील ५ लाख ९ हजार ३९५ खातेदारांना १०९२ कोटी ४८ लाख ८७ हजार ९०५ रुपयांची कर्जमाफी आतापर्यंत झाली आहे. सर्वाधिक १ लाख ७६ हजार खातेदारांना ३५२ कोटींची कर्जमाफी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे.
कर्जमाफी योजनेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३६०२ विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. ६ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी होऊन राज्य सरकारच्या आयटी विभागाने ‘ग्रीन यादी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत.
आतापर्यंत सहा ग्रीन याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यानुसार पैसेही संबंधितांच्या खात्यावर जमा केले आहेत. सातारा जिल्ह्यातून २ लाख ४० हजार ७४७ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ७६ हजार ५० जणांना ३५२ कोटी ७६ हजार ८१५ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ६७ हजार २०० जणांना ३०० कोटी ७९ लाख ८४१ रुपयांची तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ७६६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ११ हजार ७६४ जणांना २२५ कोटी १ लाख ८८ हजार ९८६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
तिन्ही जिल्ह्यांतील ६ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी ५ लाख ९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप दीड लाख शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.
७५ हजार खात्यांची फेरतपासणी
शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची संख्या आणि कर्जमाफीची आकडेवारी पाहता अजून दीड लाख शेतकरी कर्जमाफीपासून बाजूला राहिलेले दिसतात. त्यापैकी ७५ हजार २९१ खात्यांतील त्रुटी दूर करून ही खाती आयटी विभागाकडे पाठविली आहेत. त्यामुळे अजून किमान विभागासाठी एक लाख शेतकऱ्यांची यादी येईल, असा अंदाज आहे.
यादीनिहाय अशी मिळाली कर्जमाफी-
यादी खातेदारांची संख्या कर्जमाफीची रक्कम
पहिली ७०,१८५ २७२ कोटी २५ लाख ७३ हजार ८६३
दुसरी १,२०,९४७ ३६८ कोटी ८९ लाख २० हजार २५०
तिसरी २,९९,७४३ ७१४ कोटी ७९ लाख ४३ हजार ७०
चौथी १,३७,४७३ ४८० कोटी ३४ लाख २७ हजार ३९९
पाचवी १,२६,८५० ४८२ कोटी २३ लाख ६ हजार ५५०
सहावी २,३७,८६६ ६६१ कोटी ६० लाख ७० हजार ४७४
एकूण ५,०९,३९५ १०९२ कोटी ४८ लाख ८७ हजार ९०५