अवकाळीच्या पावसातील नुकसानीचा ३० टक्के निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:29 PM2019-11-20T13:29:12+5:302019-11-20T13:30:53+5:30
कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या ...
कोल्हापूर : राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांनी झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्तांना पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय सोमवारी (दि. १८) घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३० टक्के निधी मंजूर झाला असून, ही रक्कम ३८ लाख ६५ हजार रुपयांची आहे. त्याचे चार दिवसांत तहसीलदारांकडून वाटप करण्यात येणार आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील नऊ हजार ६७ शेतकऱ्यांचे १९३५.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजरा, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडून पंचनाम्यांचे काम पूर्ण करुन गेल्या आठवड्यात याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्त व मुख्य सचिवांना सादर करण्यात आला होता.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सोमवारी (दि. १८) महसूल विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यासाठी दोन हजार ५९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ३८ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे प्रत्यक्ष आदेश आज, बुधवारी येणार आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासन स्तरावरील प्र्रक्रिया पूर्ण करून ही रक्कम तहसीलदार कार्यालयांकडे ‘बीडीएस’द्वारे पाठविण्यात येईल.
त्यानंतर चार दिवसांत संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. उर्वरित निधीची रक्कम टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.