Kolhapur News: अंबाबाईच्या किरणोत्सवात 'हा' मोठा अडथळा, महापालिकेकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:17 PM2023-01-24T13:17:36+5:302023-01-24T13:22:13+5:30
२८ पासून किरणोत्सव सुरू होणार हे गृहीत धरून देवस्थान समितीच्या वतीने नियोजन
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सात अजूनही ५ खोल्यांचा मोठा अडथळा आहे. या खोल्या वेगवेगळ्या मालकांच्या असून त्या काढण्याबाबत महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी महापालिकेकडे केली. यासह अन्य अडथळ्यांची यावेळी पाहणी करण्यात आली असून हे अडथळे २६ तारखेपर्यंत काढण्यात येणार आहेत.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो, नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव ३० तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महापालिकेकडे किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी महापालिकेतील अधिकारी मयूरी पटवेगार यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांना अडथळ्यांची माहिती दिली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, विवेकानंद कॉलेजचे प्राध्यापक मिलिंद कारंजकर उपस्थित होते.
किरणोत्सवाच्या मार्गात पाच वेगवेगळ्या इमारतींच्या वरच्या मजल्यावरील खोल्यांचा अडथळा आहे, जे मोठ्या स्वरुपाचे आहेत. त्या खोल्यांवर यापूर्वीच मार्किंग करण्यात आले आहे. याशिवाय ताराबाई रोडवरील काही दुकानांचा अडथळा आहे. दुकानांचे अडथळे २६ तारखेपर्यंत काढण्यात येणार आहेत. तसेच २७ तारखेला किरणोत्सवातील अडथळ्यांची पाहणी करण्यात येणार आहे. २८ पासून किरणोत्सव सुरू होणार हे गृहीत धरून देवस्थान समितीच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.