पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस
By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 22, 2024 09:14 PM2024-04-22T21:14:14+5:302024-04-22T21:14:14+5:30
जिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा प्रथमच कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूरमधून २३, तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही मतदारसंघात दोन दोन बॅलेट युनिट लावावी लागणार आहेत. त्यासाठी वाढीव मशीन अन्य जिल्ह्यांतून मागविण्यात येत आहेत. वाढलेल्या उमेदवारांमुळे जिल्हा, निवडणूक प्रशासनाच्या नियोजनाचा मात्र कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात १५ आणि हातकणंगलेमध्ये १७ उमेदवार रिंगणात होते.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सोमवारी माघारीची अंतिम मुदत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन यंत्रणेची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.
कोल्हापूरमधून २७ अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात आहेत. हातकणंगलेमधून ३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले, त्यापैकी ५ जणांनी माघार घेतली असून, २७ उमेदवार निवडणूक लढत आहेत. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची ही आजवरच्या निवडणुकीतील विक्रमी संख्या आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी १५ हजार ४९३ कर्मचारी नियुक्त आहेत.
आणखी १४०० मशीन लागणार
जिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी नोंदविण्यात आली असून, पुणे, सोलापूरसह अन्य ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीचे मशीन आहेत त्यांच्याकडून मशीन घेतले जातील.
पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले..
निवडणूक विभागाने २३ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता १९ एप्रिलला पुरवणी यादीसह नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यानुसार ५ हजार मतदार वाढले असून, कोल्हापूर मतदारसंघातून १९ लाख ३६ हजार ४०३, तर हातकणंगले मतदारसंघातून १८ लाख १४ हजार २७७ असे एकूण ३७ लाख ५० हजार ६८० मतदार मतदानाचा हक्क बजावतील.