‘मी गाडगेबाबा’ अभियानांतर्गत ५ टन प्लास्टिक संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:05+5:302021-02-24T04:27:05+5:30
कोल्हापूर : मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यामध्ये १५०० नागरिकांनी सहभाग ...
कोल्हापूर : मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यामध्ये १५०० नागरिकांनी सहभाग घेतला, तर २० स्वयंसेवी संस्था यामध्ये सक्रिय होत्या. एका तासात सुमारे ५ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अर्थ वॉरियर्स संस्थेकडून हे अभियान राबवले. अर्थ वॉरियर्सचे निमंत्रक सुबोध भिंगार्डे, डॉ. सूर्यकिरण वाघ, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, ॲड. केदार मुनिश्वर, तृत्पी देशपांडे, आदिती गर्गे, प्र. द. गणफुले, महापालिका आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, राहुल राजगोळकर हे सहभागी झाले होते.
महापालिका उद्यान विभागाच्या १२६ कर्मचाऱ्यांनी शहरातील ५४ उद्यानांतून ७० पोती प्लास्टिक कचरा संकलित केला. यामध्ये उद्यान निरीक्षक अरुण खाडे, राम चव्हाण, अनिकेत जाधव हे सहभागी झाले होते. शहरालगतच्या ग्रामपंचायतीमधून २२०० किलो प्लास्टिक संकलित झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २३ ग्रामपंचायतींमधील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या अभियानात सहभाग घेतला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात अभियानाची सुरुवात झाली. विद्यापीठात १० पोती प्लास्टिक संकलित केले. किर्लोस्कर उद्योग समूहातील धीरज जाधव, राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पंचगंगा पूल ते वडणगे फाटा येथेपर्यंत ४० पोती प्लास्टिक संकलित केले. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्लास्टिक संकलन आणि निर्मूलनाची व्यवस्था केली.
उपक्रमात सहभागी संस्था
किर्लोस्कर उद्योग समूह, क्रीडाई, वृक्षप्रेमी, निसर्ग मित्र, गार्डन क्लब, स्वरा फाउंडेशन, रोटरी क्लब, समृद्धी विकास मंच, जरग फाउंडेशन, चांगुलपणाची चळवळ, खाटिक समाज, फेरीवाला संघटना, वुई केअर सोशल फौंडेशन, प्लास्टिक रिसायकल प्रोजेक्ट, करवीर नगर वाचन मंदिर, के.डी.एम.जी, स्वयंप्रभा मंच.
फोटो ओळी : मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा केले. (फोटो -२३०२२०२१-कोल-गाडगेबाबा)