कृषीपंप वीज जोडणीसाठी ५० टक्के शेतकरी वेटिंगवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:38+5:302021-05-13T04:23:38+5:30
कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व ...
कोल्हापूर : ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास’ अशी काहीशी अवस्था महावितरणची कृषी पंपांच्या वीज जोडणीबाबत झाली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ कमी झाल्याने जोडणीची मोहीम स्लो ट्रॅकवर आली आहे. अजूनही ५० टक्के शेतकरी प्रतीक्षेत असून, ही प्रतीक्षा किमान दिवाळीपर्यंत लांबणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, गेल्या दहा महिन्यांत २० हजारपैकी ९ हजार २६६ वीज जाेडण्या पूर्ण होऊन शिवारात पाणी खेळल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
कृषीपंपाच्या वीज जोडणीचे आगाऊ पैसे भरुनदेखील महावितरणकडून वेळेत जोडण्या मिळत नसल्याचे गेल्या पाच वर्षांतील चित्र आहे. याविरोधात इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सातत्याने शेतकरी मोर्चे, आंदोलने केली आहेत, पण बैठकीत बसल्यानंतर जोडण्या लगेच देऊ, असे सांगून अधिकारी वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या कोल्हापूर परिमंडळातील प्रलंबित बीज जाेडण्यांचा आकडा २० हजारांवर गेला.
शेतकऱ्यांनी बोअर मारुन, नदीला पाईपलाईन टाकून, मोटर जोडून ठेवली आहे; पण केवळ वीज नाही म्हणून तीन-तीन वर्षे महावितरणचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तरीही यंत्रणा फारशी हलताना दिसत नाही. दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेली जाते. शेतकऱ्यांच्या संतापामुळे अखेर डिसेेंबरमध्ये जाहीर झालेल्या नव्या वीज जोडणी धोरणात प्रलंबित वीज जाेडण्या तातडीने देण्याच्या सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिल्या आहेत. तरीदेखील यंत्रणेचा वेग वाढताना दिसत नाही.
जिल्ह्यात २० हजारांवर वीज जोडण्या प्रलंबित होत्या. त्यापैकी ९ हजार २६६ वीज जोडण्या गेल्या दहा महिन्यांत जोडण्यात आल्या आहेत, तर अजूनही १० हजार ३१५ जण प्रतीक्षेत आहेत. ही टक्केवारी ५० च्या वर जात असल्याने अजून निम्मे शेतकरी कनेक्शनच्या प्रतीक्षेतच आहेत. या जोडण्या केव्हापर्यंत पूर्ण होतील, याचे उत्तर आजच्याघडीला महावितरणकडे नाही. कोरोना व लॉकडाऊनमुळे मनुष्यबळ अपुरे असल्याचाही परिणाम वीज जाेडणीच्या कामावर होत आहे. आता पुढील महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर हे सर्व काम थांबणार आहे. पाऊस ऑक्टोबर, नोव्हेबरपर्यंत लांबत असल्याचे अनुभव पाहता, आता दिवाळीनंतरच नव्या वीज जोडण्यांना मुहूर्त मिळणार असल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्हा
झालेल्या वीज जोडण्या : ४ हजार ६४८
प्रलंबित वीज जोडण्या : ४ हजार ८३४
सांगली जिल्हा
झालेल्या वीज जोडण्या: ४ हजार ६१८
प्रलंबित वीज जोडण्या: ५ हजार ४८१