कोल्हापुरात स्वातंत्र्यसैनिकांना ५० घरे मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:02 AM2018-08-17T01:02:54+5:302018-08-17T01:02:58+5:30
कोल्हापूर : शहराजवळ २५० घरांची योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असून, यातील ५० घरे ही स्वातंत्र्यसैनिकांना मोफत दिली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे केली. राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ झाली असल्याने विकासाला निधीची कमतरता नाही, त्यामुळे समाजात प्रगतीबरोबरच सकारात्मक विचारांची सुरुवात होण्याची गरज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित केला होता. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन केले. यावेळी शाहू छत्रपती, महापौर शोभाताई बोंद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना पालकमंत्र्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर २५० घरांचा प्रकल्प हाती घेतला असून, ५०० स्क्वेअर फुटांचे घर केवळ १५०० रुपये स्क्वेअर फूट दराने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यातील ५० घरे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदणी असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना मोफत दिली जाणार आहेत. या प्रकल्पात खेळाडू, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.
‘जीएसटी’मुळे ४३ हजार कोटी जमा
महाराष्ट्रात ‘जीएसटी’मुळे गेल्या वर्षी ४३ हजार कोटी रुपये महसूल जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत जी.एस.टी.मुळे तीन हजार कोटींचे उत्पन्न वाढले आहे; तसेच मुद्रांक विभागामार्फत यंदा २६ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच हजार कोटींनी उत्पन्न वाढले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
शहीद जवानाच्या वारसांना २५ लाखांची मदत
शहीद जवान हवालदार अनंत जानबा धुरी यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून २५ लाखांची आर्थिक मदत पालकमंत्र्यांच्या हस्ते वारसांना देण्यात आली. वडील जानबा धुरी यांनी ही मदत स्वीकारली.
‘माझी कन्या भाग्यश्री’ अंतर्गत मुदतठेव प्रमाणपत्र
‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेंतर्गत परिणती प्रकाश शेलार हिच्या पालकांना ५० हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यात होणार २२ हजार
कि.मी.चे राष्टÑीय महामार्ग
पालकमंत्री म्हणाले, राज्यात पाच हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते, ते आता २२ हजार किलोमीटरचे हाती घेतले आहेत. राज्याला केंद्राकडून १ लाख ६ हजार कोटी रुपये मिळाले असून, या निधीतून एक-दोन वर्षांत रस्त्यांची कामे मार्गी लावली जातील. याबरोबरच नव्याने सहा हजार कोटींचे रस्ते हाती घेतले आहेत; सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० हजार कि.मी.च्या तीनपदरी, चौपदरी तसेच सहापदरी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात २ हजार ३२ कोटी रुपयांची ८७० कामे सुरू केली आहेत.
राज्यातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणणार
राज्यातील सध्या १८ टक्के सिंचनाखाली असणारे क्षेत्र वाढवून ते ४० टक्क्यांपर्यंत नेण्यास प्राधान्य दिले आहे.
केंद्र शासनाकडून १४ हजार कोटींचा निधी कर्जरूपाने मिळाल्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील आठ धरण प्रकल्प यामुळे मार्गी लागतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.