पासपोर्टसाठी रोज ५० मुलाखती; १५० जणांची चौकशी
By admin | Published: April 4, 2017 01:39 AM2017-04-04T01:39:00+5:302017-04-04T01:39:00+5:30
कार्यालयात गर्दी : १७ मेपर्यंतची नोंदणी फुल्ल; आतापर्यंत ३०० जणांच्या मुलाखती
कोल्हापूर : येथील पासपोर्ट कार्यालयाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी रोज ५० जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया होत असून दिवसभरात साधारणत: १५० जण कागदपत्रे आणि अन्य प्रक्रियेची चौकशी करत आहेत. कार्यालय सुरू झाल्यापासून गेल्या नऊ दिवसांत तीनशे जणांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड येथील नागरिकांचा समावेश आहे.
परराष्ट्र खात्यामार्फत कसबा बावडा मार्गावरील मुख्य पोस्ट कार्यालयात २५ मार्चला पासपोर्ट कार्यालय कार्यन्वित करण्यात आले. याठिकाणी पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यालयात रोज ५० जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया होते. त्यासाठी प्रत्येक १० जणांची बॅच केली जाते. सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत या बॅचेस्द्वारे मुलाखत, कागदपत्रांची तपासणी, बायोमेट्रिक्स घेणे, आदी स्वरुपातील प्रक्रिया पूर्ण केली जाते. कार्यालय सुरू झाल्यापासून गेल्या नऊ दिवसांत तीनशे जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पासपोर्टसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड, सोलापूर येथून नागरिक येत आहेत. दर दिवशी साधारणत: १५० जण पासपोर्टसाठीची कागदपत्रे आणि प्रक्रियेच्या चौकशीसाठी येत आहेत. दरम्यान, नागरिकांचा या कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे कार्यालय कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरसाठी कार्यान्वित असल्याचे पडताळणी अधिकारी शशिकांत नरके यांनी सांगितले. ते म्हणाले, पासपोर्टसाठीची प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयाला ई-मेल आणि स्पीड पोस्टाद्वारे रोज पाठविण्यात येतात. १७ मेपर्यंतच्या बॅचेसची नोंदणी फुल्ल झाली आहे.
पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया अशी
पासपोर्ट काढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकाने पहिल्यांदा (६६६.स्रं२२स्रङ्म१३्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावरील आॅनलाईन अर्ज भरावा. त्यानंतर पासपोेर्ट काढण्याच्या प्रक्रियेचे असलेले १५०० रुपये इतके शुल्क आॅनलाईन अथवा बँकेच्या चलनाद्वारे भरावे.
शुल्क भरल्यानंतर आॅनलाईन अर्जात मुलाखतीसाठीचे ठिकाण आणि वेळेची नोंदणी करावी. यानंतर निवडलेल्या ठिकाणी आणि वेळी मुलाखतीसाठी संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे लागते, अशी माहिती कोल्हापुरातील पासपोर्ट केंद्रामधील पडताळणी अधिकारी शशिकांत नरके यांनी दिली.