बाळूमामा देवस्थानासाठी ५० लाखांचा रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:02 AM2018-11-22T00:02:44+5:302018-11-22T00:02:48+5:30
वाघापूर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश धनगर समाज यांच्याकडून श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामा देवस्थानास ५० लाख रुपये किमतीचा रथ ...
वाघापूर : महाराष्ट्र-मध्य प्रदेश धनगर समाज यांच्याकडून श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामा देवस्थानास ५० लाख रुपये किमतीचा रथ भक्तिभावे अर्पण करण्यात आला. तसेच १२५ किलो चांदीची बाळूमामांची मूर्तीही अर्पण करण्यात येणार आहे. आदमापूर येथे रथाचे आगमन झाल्यानंतर देवस्थानचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, तसेच अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
हा रथ बनविण्यासाठी राजस्थानमध्ये १५ कारागीर दोन वर्षे अविरतपणे काम करीत होते. हा रथ बैलांनी, घोड्यांनी तसेच वाहनाने अथवा मनुष्यबळाच्या ताकदीनेही सहज ओढता येईल, अशी रचना केली आहे. या रथावर बाळूमामांचे पशू -पक्ष्यांवरील प्रेम लक्षात घेऊन रथावर मेंढ्या, शेळी, बकरा, घोडा, हत्ती, कुत्रा, हंस, आदींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या आहेत. या रथाच्या चारही बाजूंवर बाळूमामांच्या प्रतिकृतीमागोमाग कुत्रे, शेळी, मेंढी यांच्या रेखीव प्रतिकृती तयार केल्या आहेत. हा रथ पूर्णपणे सागवान लाकडापासून बनविला आहे. रथासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील धनगर समाज बांधवांकडून ५० लाख रुपये भक्तिभावे संकलित केले आहेत. बाळूमामा बग्गा नं २ चे कारभारी विष्णू गणपतराव गायकवाड (बापूमामा पिंपरीकर) यांनी याकामी पुढाकार घेतला. यशप्रभा आर्टस या कंपनीद्वारे हा रथ तयार करण्यात आला आहे. आदमापूर येथे हा रथ आल्यापासून पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
या रथाच्या पूजनप्रसंगी राजस्थान व मध्य प्रदेशमधून आलेले दलपतराज ताराचंदजी मंडोरा, यशवंत भाई, तानुहारी नानोहर, सुभाष कोळपे, नारायण कारंडे, तुळसराम गोईकर, सुभाष सरोदे, अरुण गोराणे, निसार महमद दिल्लीवाले, आदित्यराज, प्रीतमराज यांचा देवस्थान मंडळाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक दिनकरराव कांबळे, संभाजीराव भोसले, नामदेव पाटील, साताप्पा पाटील, दयानंद खतकर, राजेश कांबळे, बाळूमामा देवालयाचे मॅनेजर शंकर कुदळे उपस्थित होते.