अहिल्यादेवी होळकर यांच्या कोल्हापुरातील स्मारकासाठी ५० लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 01:53 PM2021-06-01T13:53:03+5:302021-06-01T13:55:35+5:30
Satej Gyanadeo Patil Kolahpur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले भव्य स्मारक आपटेनगर (नवीन वाशी नाका) येथे साकारण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्मारकाच्या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
येथील शाहू स्मारक भवनच्या प्रांगणात मल्हार सेना व युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्यावर्षी जयंतीदिनी कोल्हापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आपटेनगर येथील सहा हजार चौरस फूट जागेत हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक राजसिंह शेळके, राहुल माने, मोहन सालपे, धनगर महासंघाचे राघू हजारे, नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, शहाजी सीद, आनंदा देशिंगे, प्रकाश येडगे, प्रल्हाद देबाजे, बाबूराव बोडके, भारत शेळके, अनिकेत रानगे, उत्तम सीद, बाळासाहेब कोळेकर, अवधूत पाटील उपस्थित होते. मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी प्रास्ताविक केले. ह्यगोकुळह्णचे संचालक बयाजी शेळके यांनी आभार मानले.
स्मारक असणार असे
या स्मारकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि त्यांच्या कार्याचे दर्शन घडविणारी विविध १५ शिल्प, वाचनालय, कलादालन, सभागृह, बगीचा असणार आहे. स्मारकाला एकूण अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी महापालिकेने ३० लाख, तर पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी एकूण २० लाखांचा निधी दिला आहे. कोरोनामुळे यंदा साध्या पद्धतीने जयंती साजरी केली असल्याची माहिती बबन रानगे यांनी दिली.