औद्योेगिक वसाहतींना ५० लाखांचा निधी देणार
By admin | Published: October 27, 2016 12:34 AM2016-10-27T00:34:55+5:302016-10-27T00:37:38+5:30
स्थायी समितीचा निर्णय : लवकरच कामे सुरू करण्याचे आदेश
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात सिक्युरिटी आॅडिटकरिता राखून ठेवलेल्या एक कोटी रुपयांपैकी ५० लाख रुपयांचा निधी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुविधा पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. अंदाजपत्रकात फेरबदल करून सुधारित प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवून करावयाच्या कामांना मंजुरी घ्यावी आणि तातडीने कामांना सुरुवात करावी, अशा सूचनाही स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते.
गुरुवारी (दि. २०) झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत औद्योगिक वसाहतींमध्ये सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असून, गेल्या पाच वर्षांत कसलाही निधी खर्च झालेला नाही, म्हणून प्रशासनास धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘तुम्ही तरतूद का केली नाही?’ असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत अजित ठाणेकर यांनी सिक्युरिटी आॅडिटसाठी एक कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात हे काम तीन लाखांत होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात फेरबदल करून त्यातील ५० लाखांचा निधी हा औद्योगिक वसाहतींत सुविधा देण्यावर, तर उर्वरित निधी हा सार्वजनिक शौचालयांवर खर्च करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर ही सूचना मान्य करून तसे प्रस्ताव तयार करण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
वर्कशॉपचे माजी प्रमुख एम. डी. सावंत याच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी झाली असून, त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत; तथापि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याकरिता विद्यापीठाचे अधिकारी नेमले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सभेत झालेल्या चर्चेत रिना कांबळे, रूपाराणी निकम, निलोफर आजरेकर, उमा इंगळे, शोभा बोंद्रे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
दिव्यांगांना लवकरच केबिन वाटप
दिव्यांग व्यक्तींना केबिनसाठी दोन-तीन जागा निश्चित झाल्या नसल्याने केबिनचे वाटप करण्यात आले नव्हते. आता जागा अंतिमरीत्या निश्चित झाल्यामुळे लवकरच त्यांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती सभेत देण्यात आली. याबाबत रिना कांबळे व मेहजबीन सुभेदार यांनी प्रश्न विचारला होता.
रक मेचा गैरवापर उघडकीस आणला
वर्कशॉप विभागातील एका कर्मचाऱ्याने महापालिकेच्या सात ते आठ लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत अजित ठाणेकर, सत्यजित कदम, जयश्री चव्हाण यांनी संबंधित कर्मचाऱ्यासह त्याला तसलमात देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी खुलासा करताना अधिकाऱ्यांनी असा गैरवापर झाल्याचे मान्य केले. कारवाई करण्याचा तसेच पैसेवसुलीचा प्रस्ताव आयुक्तांकडे देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त पाठीशी घालत आहेत का, अशी ठाणेकरांनी विचारणा केली. शेवटी सभापती जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश दिले.