पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ५० गुणांचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:36 AM2021-02-26T04:36:53+5:302021-02-26T04:36:53+5:30
विद्यापीठामध्ये विद्या परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील ...
विद्यापीठामध्ये विद्या परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील एकूण ६२१ परीक्षा मार्च-एप्रिल दरम्यान होणार आहेत. त्यात पहिल्या सत्राच्या परीक्षांची संख्या शंभर आहे. सुमारे दोन लाख विद्यार्थी या परीक्षांसाठी नोंदणी करतील. कोरोनामुळे विद्यापीठाने २० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यामुळे या परीक्षा ८० टक्के अभ्यासक्रमावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी ५० गुणांच्या परीक्षेसाठी एक तासाची वेळ असणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, मॅनेजमेंट, शिक्षणशास्त्र, आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा क्लस्टर पद्धतीने होतील. त्यासाठी अग्रणी महाविद्यालयांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्याला विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे आदी उपस्थित होते. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यात महाविद्यालयांच्या संलग्नतेबाबत चर्चा झाली.
चौकट
समितीची पुढील आठवड्यात बैठक
या परीक्षांच्या वेळापत्रक निश्चितीसाठी नियुक्त केलेल्या गुळवणी समितीत आठ सदस्यांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांतील विविध सत्रांतील परीक्षा घेण्याची जबाबदारीसह अन्य निर्णय ही समिती घेणार आहे. समितीची पहिली बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे नियोजन असल्याचे जी. आर. पळसे यांनी सांगितले.