यंत्रमागांच्या वीज बिलात ५० पैशांची वाढ
By admin | Published: November 9, 2015 10:59 PM2015-11-09T22:59:21+5:302015-11-09T23:23:44+5:30
वस्त्रोद्योगात खळबळ : इंधन अधिभार अनुदान रद्द झाल्याचा परिणाम
इचलकरंजी : यंत्रमाग क्षेत्राला सवलतीचा वीजदर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र यंत्रमागधारकांना मिळालेली वीज बिले ४५ ते ५० पैसे प्रतियुनिट अशी वाढून आली असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. यंत्रमाग उद्योगासाठी इंधन अधिभारामध्ये असलेले ५० टक्के अनुदान रद्द झाल्याने वीज बिले वाढून आली आहेत.
रोजगाराभिमुख असलेल्या यंत्रमाग क्षेत्रात राज्यात शेतीनंतर अधिक लोक यावर अवलंबून आहेत. त्यामुळे गेली वीस वर्षे यंत्रमाग उद्योगासाठी सवलतीचा वीजदर आहे; पण गतवर्षी सत्तेवर आलेल्या भाजप-सेना सरकारकडून अनुदानाची सवलत रद्द केली आणि विजेचे भाव वाढले. त्यानंतर यंत्रमाग क्षेत्रातील आमदारांची एकजूट करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमाग क्षेत्रासाठी स्वतंत्र वर्गवारी व सवलतीचा दर असावा, यासाठी आग्रहाची मागणी केली. यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी मिळाली; पण विजेचे दर मात्र चढेच राहिले.त्यानंतर आमदार हाळवणकर यांनी वाढलेला विजेचा दर पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. तेव्हा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रमागाचे विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन दिले. दरम्यान, २८ आॅक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंत्रमाग उद्योगाच्या पूर्वीच्या दोन रुपये ५७ पैशांमध्ये फक्त नऊ पैशांची वाढ करून दोन रुपये ६६ पैसे प्रतियुनिट विजेचे दर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता यंत्रमाग उद्योजकांना आॅक्टोबर महिन्याची वीज बिले मिळाली असून, त्यामध्ये ४० ते ५० पैशांची वाढ झाल्याचे दिसत आहे. २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना चार रुपये २६ पैसेप्रमाणे, तर २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी तीन रुपये ६५ पैसे प्रतियुनिट दराने बिले मिळाल्याने येथे चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयाचा परिणाम चालू महिन्याच्या वीज बिलामध्ये दिसत नाही. उलट इंधन अधिभारामध्ये ५० टक्के असलेले अनुदान रद्द झाल्याने वीज बिले वाढून आली आहेत. सध्याच्या सरकारने अशा प्रकारची दिवाळी भेट दिली आहे. (प्रतिनिधी)