रुग्ण असलेल्या गावात ५० टक्के विद्यार्थी, जिल्हा प्रशासनाने जारी केले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:16 AM2022-01-24T11:16:15+5:302022-01-24T11:16:46+5:30
याबाबत शाळा, पालक-शिक्षक समित्यांनी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा
कोल्हापूर : कोल्हापूर शहर वगळता ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लोकसंख्येच्या १ टक्के किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल तेथील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी एक दिवसआड ५० टक्के क्षमतेने किंवा विभागून विद्यार्थी बसवावेत, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. याबाबत शाळा, पालक-शिक्षक समित्यांनी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा व जेथे ही परिस्थिती नसेल तेथील शाळा कोरोना नियमांचे पालन करून नियमितपणे सुरू राहतील.
ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये वरील निकषानुसार रुग्ण असतील शाळा व्यवस्थापन व पालक-शिक्षक समित्यांनी तातडीने बैठक घेऊन एक पर्याय निवडायचा आहे. त्यानुसार एक दिवसाआड ५० टक्के विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना दोन वर्गांत विभागून बसविणे, शाळा पूर्णपणे ऑनलाइन सुरू ठेवणे किंवा किमान ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन असतील याची खात्री करून ऑनलाइन ऑफलाइन वर्ग भरवायचे आहेत.
गरजेनुसार कोविड केंद्र सुरू
कोरोना रुग्णांचा सीपीआरवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यात १२ ठिकाणी कोविड केंद्रांची सोय करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अजून तेवढ्या संख्येने रुग्ण नाहीत तेथील केंद्र गरजेनुसार केले जातील. त्यासाठी इमारत अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची कोठेही गैरसोय होणार नाही असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.