चोरीच्या ५० दुचाकी जप्त
By Admin | Published: February 9, 2017 12:46 AM2017-02-09T00:46:38+5:302017-02-09T00:46:38+5:30
चरणचे दोघे अटकेत; चारचाकीसह १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कोल्हापूर : मुंबई, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी-चारचाकी वाहने चोरणाऱ्या चरण (ता. शाहूवाडी) येथील दोघा अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित प्रमोद ऊर्र्फ लखन मधुकर घुले (२४) व मच्छिंद्र रामचंद्र लाड (२७) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पन्नास दुचाकी, एक तवेरा असा सुमारे सतरा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांचा तिसरा साथीदार अक्षय घुले (२३) हा पसार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे. त्यांच्याकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती अशी, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे यापूर्वी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे काम पाहत होते. त्यांना तालुक्यातील खबऱ्याने संशयित प्रमोद घुले, त्याचा लहान भाऊ अक्षय व मच्छिंद्र लाड हे तिघे चोरीच्या दुचाकी गावात आणून विक्री करत असल्याचे सांगितले. धुमाळ यांनी या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना दिली. त्यानुसार मोहिते यांनी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, सचिन पंडित यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. दि. ६ रोजी संशयित प्रमोद घुले व मच्छिंद्र लाड हे दोघे डोणोली (ता. शाहूवाडी) येथील हॉटेल मैत्रीसमोर दुचाकी विक्री करण्यासाठी आले असता ताब्यात घेतले. त्यांना ‘पोलिसी खाक्या’दाखविताच तोंड उघडले. एक नव्हे तर तब्बल पन्नास दुचाकी व तवेरा चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील शाहूपुरी, वडगांव, कोडोली, शिरोली एमआयडीसी, करवीर, हुपरी, सांगली जिल्ह्णांतील शिराळा, आष्टा, कुरळुप, इस्लामपूर, देवरूख, रत्नागिरी तसेच वाशी मुंबई पोलिस ठाण्याच्या हद्दीचा समावेश आहे. तिघेही यापूर्वी रेकॉर्डवर नसल्याने ते चोरी करत असल्याची चाहूल त्यांच्या घरच्यांनाही नव्हती. प्रमोद याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई मोलमजुरी करते. तो आणि त्याचा भाऊ अक्षय कामधंदा न करता झटपट पैसा मिळविण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरीस असत. मच्छिंद्र याचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची आहे. फायनान्स कंपन्यांनी ओढून आणलेल्या गाड्यांची तो विक्री करत असे. त्यातून त्याने घुले बंधूंशी हातमिळवणी करून चोरीची वाहने विक्री करू लागला. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी सर्व वाहने हस्तगत केली. त्यांच्याकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे तांबडे यांनी सांगितले.
पैसे गेले, गाडी गेली, आता कारवाई नको...
या तिघा संशयितांकडून पन्नास लोकांनी दहा ते पस्तीस हजार रुपयांना दुचाकी विकत घेतल्या होत्या. त्या चोरीच्या असतील अशी शंकाही या लोकांना नव्हती. स्वत:ची, मित्राची, नातेवाईकांची दुचाकी असल्याचे सांगून विक्री केल्या होत्या. पोलिसांचा फोन येताच प्रत्येकाने कारवाईच्या भीतीने दुचाकी पोलिस मुख्यालयात आणून दिल्या. यावेळी ‘साहेब दुचाकी घ्या, आम्हाला माहीत नव्हत्या त्या चोरीच्या आहेत. आमचे पैसे गेले, गाडी गेली, आता कारवाई नको,’ असे हात जोडून विनंती करीत होते.