‘गोकुळ’कडून पशुखाद्याच्या दरात ५० रुपये वाढ

By Admin | Published: May 4, 2016 10:26 PM2016-05-04T22:26:53+5:302016-05-05T00:51:45+5:30

१ मे पासून दरवाढ लागू : वर्षात तिसऱ्यांदा वाढ करून दूध उत्पादकांना १५० रुपयांचा फटका

50 rupees increase in cattle rate from 'Gokul' | ‘गोकुळ’कडून पशुखाद्याच्या दरात ५० रुपये वाढ

‘गोकुळ’कडून पशुखाद्याच्या दरात ५० रुपये वाढ

googlenewsNext

कोपार्डे : प्रचंड पाणीटंचाई बरोबर वैरण टंचाईचा सामना करावा लागत असताना पशुखाद्यात गोकुळने प्रती पोत्यामागे ५० रुपये वाढ केल्याने दूध उत्पादकांसाठी दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखा झाला आहे. गेल्या वर्षभरात पशुखाद्यात तब्बल तीनवेळा वाढ केली असून, गाईच्या दूध दरात मात्र प्रतिलिटर दोन रुपये घट केल्याने दूध उत्पादकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक संकटात असताना ज्यांच्या कष्टावर ‘गोकुळ’ने आपले आर्थिक वैभव उभे केले आहे तोच संकटात असताना गोकुळ प्रशासनाने वर्षभरात तब्बल तीनवेळा पशुखाद्याचे दर वाढविले आहेत. तर दूध दरात मात्र दूध उत्पादकांच्या उत्पादन खर्चाचा विचार न करता दोन रुपये गाईच्या दूध दरात प्रतिलिटर कपात केली आहे. यामुळे दूध उत्पादकांना दुष्काळात तेराव्या महिन्याला तोंड द्यावे लागणार आहे.
१ मे पासून गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याच्या प्रती ५० किलो पशुखाद्यामागे ५० रुपये वाढ केल्याने आता ९०० रुपये ऐवजी ५० किलोचे पोते ९५० रुपयांना खरेदी करावे लागणार आहे. जानेवारी २०१६ मध्येही ५० तर जून २०१५ मध्ये ५० रुपये अशी मागील वर्षभरात तब्बल १५० रुपये ५० किलो पोत्यामागे वाढ केल्याने दूध उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मात्र याउलट गाईच्या दूध दरात कपात करताना दूध उत्पादकांच्या खर्चाचा अजिबात विचार केलेला नाही. एकीकडे दूध दरात कपात, तर दुसरीकडे पशुखाद्यात मोठी वाढ करून दूध उत्पादकांवर वरवंटा फिरविल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 50 rupees increase in cattle rate from 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.