शाळेच्या मंजुरीसाठी घेतले ५० हजार --स्थायी समिती सभा
By admin | Published: November 21, 2014 11:37 PM2014-11-21T23:37:07+5:302014-11-22T00:02:25+5:30
सुभाष रामुगडेंचा आरोप : शिक्षण विभागाचे निघाले वाभाडे
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील भांबुरे नावाच्या कर्मचाऱ्याने जुनी मोरे कॉलनीतील छत्रपती संभाजी विद्यालय या शाळेस ना-हरकत दाखला देण्यासाठी ५० हजार रुपये घेतले आहेत. याबाबतचे सबळ पुरावे आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्यानेच ही खाबुगिरी सुरू आहे. संबंधितांवर फौजदारीसह कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी आज, शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. रामुगडे यांच्या आरोपामुळे प्रशासनाची बोलतीच बंद झाली. अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते.
प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एम. किल्लेदार स्थायी बैठकीला उपस्थित राहत नाहीत. तीन महिन्यांपूर्वी बदलीचे आदेश देऊनही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले? फक्त सही करण्यासाठीच ते नोकरीवर येतात काय? असा सवाल राजेश लाटकर यांनी उपस्थित केला. प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश सभापती चव्हाण यांनी दिले.
‘नगरोत्थान’ची बिले वेळेत अदा न केल्याने त्याचा कामावर परिणाम होत आहे. साळोखेनगर येथे परवानगी न घेता केलेल्या खुदाईसाठी संबंधित कंपनीवर कारवाई करा. आरोग्य विभागाच्या कचरा उठाव करणाऱ्या गाड्या त्वरित दुरुस्त करा. शहराचा व्याप व परिसर मोठा असूनही महापालिकेकडे कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. नवीन आस्थापनांवरील पदे निर्माण करून नोकरभरती करा. टाकाळा लॅँड फिल्ड साईटचे काम दर्जेदार होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी सदस्यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)