अवजारे पुरविणारी ५० वर्षांची सेवा
By admin | Published: June 18, 2015 12:29 AM2015-06-18T00:29:24+5:302015-06-18T00:36:19+5:30
ओटवणेतील साई केंद्र : शेतकऱ्यांची धांदल; आज पारंपारिकतेलाच महत्त्व
महेश चव्हाण - ओटवणे
मान्सूनची बरसात वाढू लागल्याने आता शेतकरी शेती मशागतीच्या कामात मग्न झाला आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे निर्माण करणाऱ्या कार्यशाळा गजबजू लागल्या आहेत. शेतीसाठी लागणारे नांगर, जोत (जू), पान, फावडे, कुदळ आदी विविध अवजारांसाठी कार्यशाळेत रांग वाढू लागली आहे. ओटवणे येथील कै. गंगाराम मेस्त्री, कै. अनंत मेस्त्री यांच्या प्रेरणेने उभी राहिलेली ‘साई छाया कला केंद्र, ओटवणे’ ही कार्यशाळा ५० वर्षांहून अधिक काळ शेती अवजारे बनवित आहे. मूर्तिकार आणि हस्तकारागीर चंद्रकांत मेस्त्री, शरद मेस्त्री आणि आनंद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ही कार्यशाळा अविरत कार्यरत आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच शेतकऱ्यांना शेती अवजारे पुरवित आहे.
सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीचा शेतीत वापर करीत असला, तरी ग्रामीण भागात मात्र हव्या त्या प्रमाणात ट्रॅक्टरने या अवजारांची जागा हस्तगत केली नाही. याचे कारण म्हणजे या अवजारांचा दर्जा आणि सिद्धहस्त कारागीर हे आहे. ग्रामीण भागात काही वर्षापूर्वी बारा बलुतेदार पद्धती सुरू होती. काही गावांमध्ये तर अजूनही तुरळक प्रमाणात ही पद्धती सुरू आहे. त्यातील एक गाव म्हणजे ओटवणे आणि येथील मेस्त्री घराण्याची शाळा म्हणजे याचे मूर्तिमंत उदाहरण होय.
पैशांऐवजी आजही धान्यच
गेली ५० वर्षे ही कार्यशाळा ओटवणे-गावठणवाडी येथे कार्यरत आहे. या शाळेतून शेतीची अवजारे घेऊन जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी मोबदल्यात पैशांऐवजी धान्य देण्याची जुनी परंपरा आजही कायम राखली आहे आणि शाळेतील कारागीरही या पद्धतीचा पारंपरिक वारशाने स्वीकार करतात. केवळ ओटवणेतीलच नव्हे, तर पंचक्रोशीतील बहुतांश शेतकरी याच कार्यशाळेत शेतीच्या अवजारांची खरेदी आणि दुरुस्ती करून घेतात.
पारंपरिक अवजारांना मागणी
जरी आजच्या परिस्थितीत ट्रॅक्टरसारख्या यंत्रांनी शेती केली जात असली, तरी कोकणातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिक अवजारांना मोठी मागणी आहे. याचे कारण म्हणजे या भागात सामूहिक पद्धतीने शेती फारच कमी प्रमाणात केली जाते. तसेच येथील छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांवर ट्रॅक्टरने शेती करणे महाग ठरत असल्याने आजही बैलांची खिल्लारी जोडी आणि पारंपरिक अवजारांनाच शेतकरी पसंती देतात.