घरफाळ्याकडील ५०० प्रकरणांची छाननी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:04 PM2020-08-26T16:04:06+5:302020-08-26T16:05:31+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा घोटाळ्याप्रकरणी ५०० प्रकरणांची छाननी केली जाणार असून, त्याकरिता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मंगळवारी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. महासभेत घरफाळ्यावरून जोरदार चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तीन निर्णय घेतले.
या प्रकरणी प्रशासनाकडे आलेल्या वादग्रस्त ५०० प्रकरणांची छाननी करण्याचे काम उपायुक्त निखिल मोरे व साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांच्याकडे सोपविण्यात आले. याशिवाय साहाय्यक आयुक्त औंधकर यांना अतिरिक्त जबाबदारी म्हणून यापूर्वी दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांत पोलीस विभाग व महापालिका विधि विभाग यांच्यातील समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
सध्या उच्च न्यायालयात तसेच स्थानिक न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या अनुषंगाने वेळोवेळी प्रशासनाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पॅनेलवरील वकील विवेक घाटगे व मुकुंद पोवार यांना दिली आहे.
घरफाळा विभागातील काही प्रकरणांची माहिती नगरसेवक भूपाल शेटे व नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांच्याकडून प्रशासनाला प्राप्त होत आहे. या प्रकरणाची छाननी केली जाणार आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्याचे धोरण आयुक्त कलशेट्टी यांनी स्वीकारले आहे. त्यामुळेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वरील निर्णय घेतले आहेत.