'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहीमेत यंदा ५०० युवकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:03 AM2020-11-21T11:03:20+5:302020-11-21T11:06:36+5:30
'No Shave November' campaign, kolhapurnews "नो शेव्ह नोव्हेंबर" ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक अशी मोहीम आता कोल्हापुरातील तरुणांनी सुद्धा हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात कॅन्सर रुग्णांना या मोहिमेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे.
कोल्हापूर : "नो शेव्ह नोव्हेंबर" ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक अशी मोहीम आता कोल्हापुरातील तरुणांनी सुद्धा हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात कॅन्सर रुग्णांना या मोहिमेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे.
"नो शेव्ह नोव्हेंबर" ही मोहीम सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात १९९९ साली काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिला आहे. याचेच अनुकरण कोल्हापुरातील काही तरुणांनी केले असून अशीच मोहीम सुरू केली आहे. दर्शन शहा, शेखर पाटील आणि त्यांच्या मित्रांनी ही मोहीम हाती घेतली असून गेले 2 वर्षात त्या सर्वांनी जवळपास 10 रुग्णांना पैशांच्या स्वरूपात मदत केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कॅन्सरचे हजारो रुग्ण आहेत. ते या आजाराच्या वेदना सहन करत आहेत. त्यांच्या वेदना तर वाटून घेता येत नाहीत. पण त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी निश्चितच व्यक्त करता येऊ शकते. हा विचार दर्शन आणि शेखर यांच्या मनात आला आणि याच विचाराने त्यांनी ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक ग्रुप बनविला. त्यांच्या अन्य मित्रांनी सुद्धा या मोहिमेला पाठिंबा दिला.
सध्या जवळपास ५०० युवक यामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, वकील, इंजिनिअर आणि व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण जोडले गेले आहेत. महिनाभर दाढी करायची नाही, आणि त्यातून वाचणारी रक्कम जमा करून कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली घेतली आहे.
'नो शेव्ह नोव्हेंबर' या मोहिमेच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम 1 डिसेंबर रोजी संबंधित रुग्णांना देण्यात येते. या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी गेल्या 2 वर्षांपासून प्रतिसाद दिलाच आहे. यापुढेही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी या मोहिमेला तरुणांनी हातभार लावावा असे आवाहन सुद्धा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्यालाही या मोहिमेत सहभागी होऊन कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करायची असेल तर या मुलांच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर 7875707175 आणि 8999912008 नंबरवर संपर्क साधा.