महामार्गावर रोज ५००० किलो घनकचरा

By admin | Published: January 19, 2016 12:26 AM2016-01-19T00:26:52+5:302016-01-19T00:35:35+5:30

सेवामार्गावरील व्यवसायांचा फटका : कचरा आणि टाकाऊ पदार्थांमुळे रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा त्रास, अपघाताचे ठरते कारण--समस्यांचा महामार्ग

5000 kg solid waste daily on the highway | महामार्गावर रोज ५००० किलो घनकचरा

महामार्गावर रोज ५००० किलो घनकचरा

Next

सतीश पाटील -- शिरोली
तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनमधून महिन्याला दीडशे टन घनकचरा निघतो. म्हणजे दररोज सरासरी ५००० हजार किलो कचरा. या कचऱ्यामुळे आणि पदार्थांमुळे भटक्या कुत्र्यांचा महामार्गावर वाहनधारकांना (खासकरून दुचाकीस्वारांना) मोठा त्रास सहन करावा लागतो.
कागल-सातारा महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी तीन फुटांच्या ड्रेनेजलाईन तयार केल्या. तसेच भुयारी मार्गात ही ड्रेनेजलाईन घालण्यात आली; पण या दोन्ही ड्रेनेजलाईनची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सतत ड्रेनेजलाईन तुंबलेली असते. सांडपाणी भुयारी मार्गावरून सेवामार्गावर येते.
या ड्रेनेजलाईन तुंबण्याचे प्रमुख कारण म्हणजे सेवामार्गावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांवरील प्लास्टिक पिशव्या, चिकन सिक्स्टी फायचे खरकटे मांस, हॉटेल, धाब्यांमधील शिल्लक अन्न, प्लास्टिक, कचरा, सेवामार्गावरील ओपन बार, उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी, त्यांनी टाकलेल्या बाटल्या यामुळे ड्रेनेजलाईन तुंबतात. यामधून महिन्याला तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत दीडशे टन घनकचरा या ड्रेनेजमधून गोळा होत असतो.
महामार्ग, सेवामार्ग, भुयारी मार्ग, ड्रेनेजलाईन स्वच्छ रहावेत, म्हणून महामार्गाचे ठेकेदार जयहिंद रोड बिल्डर्स कंपनीने तावडे हॉटेल ते टोपपर्यंत महामार्गावरील गांधीनगर, शिरोली, नागाव, टोप या गावांच्या ग्रामपंचायत, सरपंच यांच्याशी संपर्क साधून सेवामार्गावरील चहाच्या टपरी, हॉटेल, धाबे, बीअर बार, वाईन शॉप, चिकनच्या गाड्या यांना ड्रेनेज लाईनमध्ये कचरा टाकू देऊ नये, याबाबत पत्रव्यवहारसुद्धा केला आहे; मात्र ग्रामपंचायतींनी कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. महामार्गाशी संबंधित स्वच्छतेचा संबंध नसल्याचे ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे.
महामार्गावरील किरकोळ अपघात टाळण्यासाठी ड्रेनेजलाईन आणि सेवामार्ग मोकळे असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनची सफाई आमच्याकडून केली जाते; पण स्थानिक व्यावसायिक लोक मांस, प्लास्टिक पिशव्या, कचरा, मद्याच्या बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकतात. मग ड्रेनेजलाईन तुंबते आणि सांडपाण्याचा निचरा झाला नाही की पाणी सेवामार्गावर येते. तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महिन्याला दीडशे टन घनकचरा गोळा होतो.
- विक्रम साळोखे, जयहिंद रोड बिल्डर्स

शिरोलीमधील घनकचरा उचलण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. आमचा कचरा आम्ही उचलतोय. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईन स्वच्छ करण्याचे काम ठेकेदाराचे आहे. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वेळेत ड्रेनेजलाईन स्वच्छ केल्या तर ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्नच नाही. - बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली

Web Title: 5000 kg solid waste daily on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.