शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार जमा करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:45+5:302021-05-15T04:21:45+5:30
कुरुंदवाड : साखर कारखान्यांनी गत गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा हप्ता अद्याप दिलेला नाही. तो त्वरित द्यावा तसेच ...
कुरुंदवाड : साखर कारखान्यांनी गत गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा हप्ता अद्याप दिलेला नाही. तो त्वरित द्यावा तसेच प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने जाहीर केलेली पन्नास हजारांची रक्कम जमा करावी. अन्यथा स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासो चौगुले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
गतवर्षी गळितास गेलेल्या उसाचा कारखान्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे साखर कारखानदार व स्वाभिमानी संघटनेच्या बैठकीत ठरले होते. मात्र, गळीत हंगाम संपून चार महिने झाले तरी शेतकºयांना अद्याप पूर्ण रक्कम मिळाली नाही.
प्रामाणिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, त्याचीही अद्याप अंमलबजावणी नाही. लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला, फळभाजी शेतातच कुजत आहेत. बियाणे, मजुरी, औषधे, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम आणि शासनाने जाहीर केलेली पन्नास हजारांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करावी, अन्यथा ‘स्वाभिमानी स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.