सांगली, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी भरले ५१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:30+5:302021-02-24T04:27:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. ...

51 crore paid by farmers in Sangli, Kolhapur | सांगली, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी भरले ५१ कोटी

सांगली, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी भरले ५१ कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. आवाहन केल्याच्या महिनाभरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २३ हजार ६७३ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी तब्बल ५० कोटी ९४ लाखांचे वीज बिल जमा करून आपले दायित्व पुन्हा एकदा निभावले आहे. कोल्हापूरचा वाटा ९ कोटी ७६ लाखांचा तर सांगली ४१ कोटी १८ लाखांचा आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. थकबाकीदार कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. योजनेत एक ते तीन वर्षासाठी सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३०टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के माफ करण्यात येईल.

बॉक्स १ कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९०४ कृषी ग्राहकांकडे ४७७ कोटी ६६ लक्ष रुपयांची एकूण वीज बिल थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे ४६ कोटी ९३ लक्ष माफ करण्यात आले आहेत. उरलेल्या मूळ थकबाकीच्या ४३० कोटी ७२ लक्षापैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २१५ कोटी ३६ लक्ष रक्कम माफ करण्यात येणार आहे.

बॉक्स ०२ सांगली

सांगली जिल्ह्यात २ लक्ष ३९ हजार २७९ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे १२८४ कोटी १८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २२९ कोटी २ लाख माफ करण्यात आले आहे. उरलेल्या मूळ थकबाकीच्या १०५५ कोटी १६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे ५२७ कोटी ५८ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.

Web Title: 51 crore paid by farmers in Sangli, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.