५१ गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: July 22, 2014 11:20 PM2014-07-22T23:20:49+5:302014-07-22T23:34:33+5:30
पाटण तालुक्यात जोरदार पाऊस : कोयना, वांग नद्यांवरील अनेक पूल पाण्याखाली
कोयनानगर / पाटण : पाटण तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेल्याने ३५, तर वांग नदीमुळे ढेबेवाडी खोऱ्यातील १६, अशी सुमारे ५१ गावे संपर्कहीन झाली आहेत. तसेच दरडी कोसळल्याने मोरणा विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे मोरणा विभागात दिक्षीजवळ रस्त्यात दरड कोसळल्या आहेत. त्यामुळे बाहे, पाचगणी, पांढरेपाणी, आटोली, नागवणटेक, आदी गावांचा संपर्क तुटला आहे. पाटण-मोरगिरी रस्त्यावरील नेरळे गावाजवळ ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
पाटण शहरातून जात असलेल्या कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा झाला. कऱ्हाड-चिपळूण रस्त्याला पर्यायी समजल्या जाणाऱ्या नेरळे-मेंढेघर रस्त्यावरील, मोरणा नदीवरील वाडीकोनावडे फरशी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे कुसरुंड, नाटोशी, आंब्रग, आडदेव, सोनवडे, सुळेवाडी या गावांतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना पलीकडे अडकून पडावे लागले.
कोयना व चांदोली अभयारण्यात पावसाचे तांडव सुरू असून डोंगरावरील मळे-कोळके, पांथरपूज, नाव, पांढरेपाणी, निवी, कसणी, आदी गावांतील लोकांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. जाईचीवाडी येथील धोंडिराम पवार यांच्या घराची भिंत पावसामुळे पडली.
सणबूर / ढेबेवाडी : ढेबेवाडी खोऱ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वांग नदीवरील / बनपुरी, मंद्रुळकोळे व काढणे येथील पूल पाण्याखाली जाऊन सुमारे १६ गावांचा संपर्क तुटला आहे. वांग नदीवरील बनपुरी येथील पूल आज, मंगळवारी पाण्याखाली गेला. त्यामुळे बनपुरी पेठ, कडववाडी, हिंगमोडेवाडी ही गावे संपर्कहीन झाली. येथील वाहतूक ठप्प आहे. पाटण-ढेबेवाडी मार्गावरील मंद्रुळकोळे मार्गावरील वांग नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प होती. मालदन मार्गे पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली. वांग नदीला आलेल्या पुरामुळे काढणेतील पूलही पाण्याखाली गेला आहे. यामुळे परिसरातील काढणे, तुपेवाडी, बागलवाडी, शिद्रुकवाडी, काजार वाडी, डुबलवाडी, पांढऱ्याचीवाडी आदींसह १३ गावांचा संपर्क तुटला आहे. (प्रतिनिधी / वार्ताहर)
पाटणची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा फक्त बैठका व कक्षापुरती मर्यादित झाली आहे. मोरणा नदीवरील वाडीकोनावडे येथील नवीन पूल खुला न केल्यामुळे लोकांना जीव धोक्यात घालून जुन्या फरशी पुलावरून जावे लागत आहे. दिक्षी येथे दरड कोसळल्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. नेरळे गावाजवळ ओढा तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत.
पाटण : कोयना धरणात आज, मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत ३५.९४ टीएमसी पाणीसाठा झाला. पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये चार टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना येथे १२९ मि.मी., नवजा ९७ मि.मी., तर महाबळेश्वर येथे १९७ मि.मी. पाऊस
झाला.