जिल्ह्यातील बारावीच्या ५२ हजार विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:51+5:302021-07-29T04:25:51+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे या उद्देशाने शासनाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जूनच्या पहिल्या ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे या उद्देशाने शासनाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५२ हजार २९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे ५१ हजार ७४९, तर सीबीएसई बोर्डाच्या ५५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य मंडळाने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा, तर आयएससीई बोर्डाने गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे राज्य मंडळ आणि सीबीएसईच्या बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालकांनी प्रतीक्षा लागली आहे. अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.२ ऑगस्टपर्यंत आहे. शासकीय, अनुदानित आणि खासगी पॉलिटेक्निकमधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि.३०) पर्यंत आहे. मात्र, या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, अद्याप प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
चौकट
सीबीएसई दहावीला ३८०० विद्यार्थी
जिल्ह्यातील सीबीएसई बोर्डाच्या २८ शाळांमधील ३८०० विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांची परीक्षा देखील रद्द झाली आहे. त्यांचा निकालही अद्याप जाहीर झालेला नाही.