५३ हजार कोरोना योद्धे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:54+5:302021-05-15T04:21:54+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून योगदान देत असलेल्या ५३ हजार २१७ ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत योद्धा म्हणून योगदान देत असलेल्या ५३ हजार २१७ हेल्थकेअर व फ्रंटलाईन वर्कर्सना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा करावी लागत आहे. या दोन्ही गटातील कर्मचाऱ्यांचे पहिल्या डोसचे १४७ टक्के तर दुसऱ्या डोसचे ६६ टक्के लसीकरण पूर्ण झाले.
कोल्हापुरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येत होती. परंतु सुरुवातीच्या काळात लसीबाबत असलेले समज गैरसमज विचारात घेता या वर्गवारीतील कर्मचारीही लस घेण्याच्या बाबत नाखुश होते. त्यामुळे पहिल्या काही दिवसात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सक्ती करुन प्रत्येक विभागाला लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले. तेव्हा कुठे या लसीकरणास गती मिळाली.
लसीकरणाकरिता जिल्हा प्रशासनाने प्रारंभी ३८ हजार २५६ हेल्थकेअर वर्कर्सचे तर २९,८२१ फ्रंटलाईन वर्कर्सचे उद्दिष्ट ठरविले होते. प्रत्यक्षात लसीकरण मात्र त्यापेक्षाही जास्त झाले. ४० हजार ९१७ हेल्थ केअर वर्कर्सनी तर ५६ हजार २१० फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला डोस घेतला. तर २१ हजार ३२१ हेल्थकेअर वर्कर्स तर २२ हजार ५८९ फ्रंटलाईन वर्कर्सनी दुसरा डोस घेतला. पहिला डोस जेवढ्यांनी घेतला तेवढेच दुसरा डोस घेण्यास पात्र असतील. ५३ हजार २१७ कर्मचारी दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यात सध्या लसीचा तुटवडा असल्याने आणि दुसऱ्या डोसची तारीख जवळ आल्यामुळे आरोग्य प्रशासनाने प्राधान्यक्रमाने दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत या वर्गवारीतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होईल, असे सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांचा प्रकार उद्दिष्ट पहिला डोस दुसरा डोस
- हेल्थ केअर वर्कर - ३८,२५६ ४०,९१७ २१,३२१
- फ्रंटलाईन वर्कर - २९,८२१ ५६,२१० २२,५८९
- एकूण कर्मचारी - ६८,०७७ ९७,१२७ ४३,९१०