‘गोकूळ’ टँकरचे ५.३२ कोटी भाडे वाचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:18+5:302021-06-16T04:31:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) दूध वाहतूक टँकरच्या भाड्यात प्रतिलिटर १७ पैशांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) दूध वाहतूक टँकरच्या भाड्यात प्रतिलिटर १७ पैशांची कपात करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे संघाचे वर्षाला ५ कोटी ३२ लाख रुपये वाचणार आहेत. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना विभागीय उपनिबंधक (दुग्ध) विभागाने मुदतवाढ नाकारल्याने आता नवीन अधिकारी शोधावा लागणार आहे.
‘गोकूळ’ची मुंबई, पुणे व स्थानिक चिलिंग सेंटरवरून दूध वाहतूक करणाऱ्या टँकर भाड्यावरून निवडणूक गाजली. सत्तांतर झाल्यानंतर टँकरचे भाडे कमी करण्याची सूचना संघाच्या नेत्यांनी केली होती. त्यानुसार मंगळवारी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत टँकर भाड्यासह विविध मुद्यांवर चर्चा झाली. टँकर भाडे जिल्ह्यातील ‘वारणा’ दूध संघाप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये १७ पैसे कमी झाले आहेत. ‘गोकूळ’चे पुणे, मुंबईसह स्थानिक चिलिंग सेंटरकडून रोज सरासरी ८ लाख ६४ हजार लिटरची वाहतूक होते. प्रतिलिटर १७ पैसे कमी झाल्याने संघाचे ५ कोटी ३२ लाख रुपये वाचणार आहेत. नवीन दराची १ जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाले आहेत. मागील संचालक मंडळाने त्यांना मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ संपल्यानंतर पुन्हा विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, त्यांनी मुदतवाढीस मान्यता दिली नाही. त्यामुळे घाणेकर कार्यमुक्त झाले आहेत.
अमृत कलश पूजन निमंत्रणावरून विरोधक आक्रमक
‘गोकूळ’मध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत २० लाख लिटरचे अमृत कलश पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी चार संचालकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. हा मुद्दा मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विरोधी संचालकांनी उपस्थित केला. चिलिंग सेंटर भेटीवेळी बोलवूनही आला नाही, त्यामुळे आमच्यासोबत तुम्हाला यायचे नाही, असे वाटल्याने कलश पूजनला बोलवले नसल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक पदासाठी अर्ज मागवणार
डी. व्ही. घाणेकर कार्यमुक्त झाल्याने त्यांच्या ठिकाणी अनुभवी अधिकारी नेमावा लागणार आहे. या पदासाठी ‘गोकूळ’ लवकरच जाहिरात देऊन अर्ज मागवणार असून त्यातून निवड करण्यात येणार आहे.