Kolhapur News: अग्निवीर भरती प्रक्रियेत ५३६ उमेदवार पात्र, १६७ मधून एकाची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:34 PM2023-01-30T15:34:21+5:302023-01-30T15:34:42+5:30
तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टिंग
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेचा निकाल रविवारी (दि. २९) सैन्य दलाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांसाठी ५३६ उमेदवार पात्र ठरले आहेत.
कोल्हापुरात पार पडलेल्या सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी सुमारे ९० हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. जनरल ड्यूटी पदांसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना बोलावण्यात आले होते. तर नर्सिंग पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील उमेदवार उपस्थित होते. जनरल ड्यूटी पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल रविवारी जाहीर झाला. पात्र ठरलेल्या ५३६ उमेदवारांचे क्रमांक संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टिंग
पात्र ठरलेल्या उमेदवारांना कोल्हापुरातील टेंबलाई टेकडी येथील सैन्य दलाच्या एआरओ कार्यालयात तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान हजर राहण्याच्या सूचना सैन्य अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. हजर होताना सर्व शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत.
१६७ मधून एकाची निवड
अग्निवीर भरतीसाठी तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अवघ्या चार वर्षांची नोकरी असली तरी त्यासाठी ९० हजार तरुणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. उदंड प्रतिसादामुळे एका जागेसाठी तब्बल १६७ उमेदवारांना संघर्ष करावा लागला.