रंकाळ्यासह ५४ उद्यानांचा लूक बदलणार

By admin | Published: May 27, 2017 12:21 AM2017-05-27T00:21:36+5:302017-05-27T00:21:36+5:30

शहर सौंदर्यीकरण प्रकल्प : महापालिका, केएसबीपी दरम्यान पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे सामंजस्य करार

54 gardens look changed with the rolls | रंकाळ्यासह ५४ उद्यानांचा लूक बदलणार

रंकाळ्यासह ५४ उद्यानांचा लूक बदलणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासन आणि केएसबीपी या धर्मादाय संस्थेतर्फे शहरातील सर्व उद्याने व रंकाळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, त्याचे विकास आराखडे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती शुक्रवारी महापौर हसिना फरास व ‘केएसबीपी’चे सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, तसेच पर्यटकांचा ओढाही वाढेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांतर्गत शहरातील ५४ उद्यानांचे विकास आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यांपैकी पहिल्या टप्प्यात हुतात्मा पार्क, महावीर उद्यान व राजारामपुरी येथील उद्यान अशा तीन उद्यानांच्या सौंदर्यीकरणासह रंकाळा तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. रंकाळा परिसर विकासासाठी ‘रंकाळा तलाव विकास समिती’ स्थापन करण्यात येईल. पर्यटकांची गरज लक्षात घेऊन त्याचा विकास केला जाईल. सध्या त्यासंबंधीचे आराखडे तयार केले जात आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
महानगरपालिका व कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएसबीपी) हे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे सामंजस्य करार करीत आहेत. या प्रकल्पांतर्गत शहरातील चौक, ट्रॅफिक आयलंडसाठी अशासकीय संस्थांबरोबर करार करण्यास महानगरपालिकेने परवानगी दिली आहे, असे सुजय पित्रे यांनी सांगितले.
या कराराद्वारे महापालिकेने फक्त धोरणात्मक निर्णय घेणे आणि ‘केएसबीपी’ने सुयोग्य आराखडे बनवून त्यांची अंमलबजावणी, देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेता प्रवीण केसरकर, महिला व बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, शिक्षण मंडळाच्या उपसभापती सुरेखा शहा, माजी नगरसेवक आदिल फरास, राहुल कुलकर्णी उपस्थित होते.


कोल्हापूरला ५६ लाख पर्यटक देतात भेट
कोल्हापूर शहरात दरवर्षी साधारणपणे ५६ लाख पर्यटक भेट देतात, अशी माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे; परंतु त्यापैकी बहुतांश पर्यटक शहरात मुक्काम करण्याचे टाळतात.
त्याला कारण म्हणजे या ठिकाणी पाहण्यायोग्य ठिकाणे कमी आहेत अथवा असलेल्या ठिकाणांचा योग्य विकास झालेला नाही म्हणून! नेमका याचाच अभ्यास करून शहराच्या विकासाचे आराखडे तयार केले जात आहेत.
रंकाळा तलावावर आलेला पर्यटक या ठिकाणी तीन-चार तास फिरला पाहिजे, अशा प्रकारे परिसर विकसित केला जाईल. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पार्किंग, वाहतूक व्यवस्थेसह फूड मॉल, पाहण्यासारखे बरेच काही करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सुजय पित्रे यांनी सांगितले.


विद्रूपीकरण करणे थांबवा
सौंदर्यीकरणामुळे शहरातील रस्ते, उद्याने, चौक, आयलॅँड स्वच्छ व सुंदर दिसणार आहेत.
त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रकल्पातील समाविष्ट रस्ते, आयलॅँड, चौक यांचे विद्रूपीकरण करू नये, असे आवाहन महापौर हसिना फरास यांनी केले आहे.
जर तसा प्रयत्न झाला तर विद्रूपीकरण कायद्यातील कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

‘पीपीपी’ म्हणजे काय?
शहर सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे (पीपीपी) राबविण्यात येणार आहे. पीपीपी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात खासगी गुंतवणूक होय. विकासाच्या कामात अशी गुंतवणूक करणे आणि त्याचा मोबदला गुंतवणूकदारास अन्य मार्गांनी उदा. जाहिरातीच्या हक्काद्वारे देण्यात येतो. एखाद्या कंपनीने त्यांच्या व्यवसायातील रक्कम अशा सार्वजनिक क्षेत्रात गुंतविली तर त्या कंपनीचे ब्रॅँडिंग करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असते.


‘केएसबीपी’ने काय केले?
१५ कि.मी. रस्ते, २१ आयलँड, ११ चौक विकसित केले.
या रस्त्यांवर दुभाजकांमध्ये झाडांचे संगोपन व देखभाल
२० पब्लिक सेफ्टी आॅफिसर वाहतूक शाखेला दिले.
पोलीस मुख्यालयासमोर उद्यान विकसित केले.
राज्यातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभा केला.

Web Title: 54 gardens look changed with the rolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.