बेळगावमध्ये गुरुवारी ५४५ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:31 AM2021-04-30T04:31:50+5:302021-04-30T04:31:50+5:30
बेळगाव जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि. २९ एप्रिल) नव्याने ५४५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २८२२ इतकी झाली ...
बेळगाव जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि. २९ एप्रिल) नव्याने ५४५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २८२२ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्यामुळे १५६ जणांना शुक्रवारीहॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात आढळून आलेले 545 कोरोनाबाधित रुग्ण ही आतापर्यंतची उच्चांकी रुग्ण संख्या आहे.
गतवर्षी ३९२ ही एका दिवसात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची सर्वाधिक संख्या होती. सध्या बेळगाव जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्ण अर्थात सक्रिय रुग्ण २८२२ इतके असून मृत्यूचा आकडा ३६० वर पोहोचला आहे.
गेल्या १ एप्रिल २०२१ पासून आतापर्यंत जिल्ह्यात ४५६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर राज्यात नव्याने ३५ हजार २४ कोरोनाग्रस्त सापडले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने आढळून आलेल्या ५४५ रुग्णांपैकी सर्वाधिक १५७ रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये अथणी तालुक्यातील ७६, बैलहोंगल ५०, चिक्कोडी ३०, गोकाक १०४, हुक्केरी १८, खानापूर १०, रामदुर्ग १५, रायबाग ३८, सौंदत्ती तालुक्यातील ३० आणि इतर १७ रुग्णांचा समावेश आहे.