‘५५ कोटी नि गांधी हत्या’: गांधीजींबद्दल प्रेम, आस्था निर्माण करणारे नाटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:23 AM2018-07-09T00:23:08+5:302018-07-09T00:23:14+5:30
कोल्हापूर : मानवी मनाचा वेध घेत, महात्मा गांधीजींबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करण्याचे काम करीत, महात्मा गांधीजींच्या कार्याचे समर्थन करण्याचे काम ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या माध्यमातून रविवारी करण्यात आले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ व निर्मिती विचार मंचच्या वतीने या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. ७० वर्षांनंतर महात्मा गांधीजींच्या खुनाची वस्तुस्थिती ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्याबद्दलचे योगदान, त्यांच्या त्या काळातील संघर्षमय प्रवासासह ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हे नाटक महात्मा गांधीजींना भारत देशाचे, या देशावर प्रेम करणारे नेते म्हणून पुढे आणण्याचे काम करते. भारत देश, त्यातील विविधता, विविध राजकीय पक्ष, विविध विचारसरणी यांचा मागोवा घेत असताना महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी निर्माण केलेले वातावरण, त्यांची विचार करण्याची क्षमता यांवर भाष्य, या नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. महात्मा गांधीजींना विरोध करणाऱ्या, त्यांना नाकारणाºया विचारसरणीच्या प्रक्रियेवरही हे नाटक भाष्य करते.
विद्रोही लेखक पार्थ पोळके यांनी ‘५५ कोटी नि गांधी हत्या’ हा विषय अतिशय आस्थेने आणि प्रामाणिकपणे, इतिहासाचा आढावा घेत मांडला आहे. संशोधनाच्या पातळीवर पुरावे देत गांधीजींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकात नवकलाकार असले
तरी त्यांनी केलेला हुबेहूब
अभिनय लोकांच्या काळजाला भिडणारा आहे.
या नाटकाचे लेखन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी केले आहे. दिग्दर्शक किरण पवार, निर्मिती शशी गाडे, रंगभूषा प्रशांत इंगवले, वेशभूषा स्नेहा धडवाई, तर संगीत ओमेस साठे यांचे आहे. नाटकाचे आयोजन रघुनाथ कांबळे, सुरेश केसरकर, करुणा मिणचेकर, कमलाकर सारंग, प्रभाकर पाटील, सुरेखा भोसले, अनिल म्हमाने यांनी केले होते. नाटक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.