वाहनधारकांकडून ५५ लाख ८९ हजार दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:56+5:302021-04-23T04:26:56+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता बिनखास्त फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी शस्त्र उगारले. गेल्या आठवड्याभरात ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता बिनखास्त फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांनी शस्त्र उगारले. गेल्या आठवड्याभरात पोलिसांनी मोटर वाहन कायद्यांतर्गत सुमारे ३० हजार ४२० वाहनधारकांकडून सुमारे ५५ लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्कप्रकरणी २० लाख ६२ हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना संक्रमण सुरू असताना प्रशासनाने संचारबंदी पुकारली. त्यामुळे संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस करवाई करत आहेत, तरीही नागरिकांची व वाहनांची रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. दि. १४ ते २२ एप्रिलपर्यंत पोलिसांनी सुमारे ३० हजार ४२० वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार कारवाई करून तब्बल ५५ लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. तसेच त्या वाहनाचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणारी १९०८ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. ही वाहने लॉकडाऊन संपल्यानंतर दंडात्मक कारवाई करून परत देण्यात येणार आहेत. याशिवाय विनामास्कप्रकरणी ९८४३ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २० लाख ६२ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे.
गुरुवारी दिवसभरात चार लाख दंड वसूल
गुरुवारी एका दिवसात वाहन कारवाई व विनामास्कप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सुमारे चार लाख दोन हजार रुपये दंड वसूल केला. यामध्ये १६२० वाहनधारकांकडून दोन लाख ८९ हजार ९०० रुपये दंड वसूल केला, तर विनामास्कप्रकरणी ३४३ जणांकडून एक लाख १२ हजार १०० रुपये दंड वसूल केला. तसेच दिवसभरात १७३ जणांची वाहने जप्त केली.