पहिल्याच दिवशी २८ एस.टी.च्या ५५ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 06:37 PM2020-08-20T18:37:06+5:302020-08-20T18:38:41+5:30
कोल्हापूर जिल्हा बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी २८ बसेसद्वारे ५५ फेऱ्या झाल्या. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोल्हापूर : जिल्हा बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी २८ बसेसद्वारे ५५ फेऱ्या झाल्या. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे गेल्चा चार महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील एस.टी.महामंडळाच्या सर्व बसेस प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. गुरुवारी त्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांसह चालक व वाहकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा गजबजून गेला.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने एस.टी.बसेसनाही जिल्हा बंदी करण्यात आली होती. चार महिन्यांनंतर आंतर जिल्हासह जिल्हांतर्गत प्रवासी वाहतुकीला राज्य शासनाने परवानगी दिली. त्यानुसार कोल्हापूर विभागातून सकाळी सहा वाजल्यापासून २८ बसेसद्वारे विविध मार्गांवर ५५ फेऱ्या मारण्यात आल्या. त्यास प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सकाळी सहा वाजता कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-इस्लामपूर, कोल्हापूर-सोलापूर अशा मार्गावर बसेस धावल्या. त्यात प्रत्येक बसमध्ये सोशल डिस्टन्स पाळून एकूण २२ प्रवाशांना प्रवास करता आला तर आजरा, चंदगड, गारगोटी, कागल, राधानगरी, या आगारांतूनही प्रत्येकी एक बस पुणे मार्गावर धावली. गगनबावडा, कागल या मार्गावरून सातारा आगारासाठी प्रत्येकी एक बस धावली.
इचलकरंजी आगारातून इचलकरंजी-सांगली, कुरुंदवाड-सांगली, इचलकरंजी-मिरज या मार्गावर धावल्या. गेले चार महिन्यांपासून मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर ओस पडला होता. गुरुवारी सकाळपासून बसेस सुरू होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या दुकानदाराचेही चेहरे फुलले. विशेषत: एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: प्रवाशांना ई-पासचे बंधन घालण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोल्हापुरात अडकून पडलेल्या नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला.
प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ज्या मार्गावर जादा मागणी आहे, त्या मार्गावर जादा बसेसची सोय केली जाईल. सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर करून प्रवासी वाहतूक केली जात आहे.
-रोहन पलंगे,
विभाग नियंत्रक, एस. टी.महामंडळ, कोल्हापूर