प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी; १५० कोटींची गरज 

By राजाराम लोंढे | Published: February 7, 2023 01:10 PM2023-02-07T13:10:24+5:302023-02-07T13:10:55+5:30

दोन्ही याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ६३२ शेतकरी पात्र

55 thousand farmers in Kolhapur district awaiting incentive subsidy; 150 crores required | प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी; १५० कोटींची गरज 

प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ हजार शेतकरी; १५० कोटींची गरज 

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा कायम असून, दोन्ही याद्यांमधील पात्र ५५ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्याशिवाय काही त्रुटी राहिलेली व दुरूस्ती झालेली पाच ते सहा शेतकऱ्यांची नावे अद्याप यायची आहेत. अनुदान देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याने रक्कम मिळण्यात अडचणी असल्याचे सांगण्यात येत असून, जिल्ह्यासाठी अजून किमान १५० कोटीची गरज आहे.

दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली. या योजनेंतर्गतच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यामध्ये जिल्ह्यातून ३ लाख १ हजार ६४४ शेतकऱ्यांनी माहिती भरली. पहिली व दुसरी यादी जाहीर करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख २९ हजार पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यामधील जवळपास १ लाख १८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४० कोटी ७० लाख रुपये वर्ग झाले आहेत. 

पहिल्या यादीत काही त्रुटी राहिल्याने सुमारे ११ हजार शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत. पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा दुसऱ्या यादीकडे लागल्या. तब्बल अडीच महिन्यांनी दुसरी यादी शासनाने प्रसिध्द केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५७ हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. दोन्ही याद्यांमध्ये जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार ६३२ शेतकरी पात्र आहेत.

त्यापैकी १ लाख ८४ हजार ८८८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणही पूर्ण केले आहे. दुसऱ्या यादीतील केवळ १० हजार ५०६ शेतकऱ्यांचे ३९ कोटी १० लाख रुपये आले. दोन्ही पात्र याद्यांमधील ५५ हजार ६९१ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यासाठी किमान १५० कोटी आणखी लागू शकतात.

‘प्रोत्साहन’ची पंचवार्षिक योजना होणार

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमुक्ती व प्रोत्साहनची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने त्याची अंमलबजावणी केली. राज्यात नवीन सरकार येऊन साडेतीन वर्षे होत आहेत. तरीही प्रोत्साहन अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे.

दृष्टिक्षेपात ‘प्रोत्साहन’अनुदान -

  • माहिती भरलेले शेतकरी - ३ लाख १ हजार ६४४ 
  • दोन्ही याद्यांतील पात्र - १ लाख ८६ हजार ६३२ 
  • आधार प्रमाणिकरण पूर्ण - १ लाख ८४ हजार ८८८ 
  • पैसे मिळालेले शेतकरी - १ लाख ३० हजार ९४१ 
  • रक्कम - ४७९ कोटी ८० लाख
     

‘प्रोत्साहन’च्या दुसऱ्या यादीतील अनुदान आठवडाभरात - मुख्य सचिव

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते, दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना आठवड्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल, त्याचबरोबर तिसऱ्या यादीतील अनुदानाची फाईल वित्त विभागाकडे असून फेब्रुवारीअखेर ही मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून पुरवणी मागणीतून मार्च अखेरपर्यंत सर्व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आश्वासन राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रलंबित प्रोत्साहन अनुदानाबाबत मुख्य सचिव श्रीवास्तव यांची सोमवारी भेट घेतली.

शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर जाऊन आधार प्रमाणिकरण केले, त्याचा संदेशही संबंधितांच्या मोबाईलवर आला, पण प्रत्यक्ष रक्कमच अजून खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या नियमांनुसार ज्यादिवशी आधार प्रमाणिकरण होईल त्याच दिवशी ही रक्कम जमा होणार होती म्हणून शेतकरी बँकेत हेलपाटे मारत आहेत, पण शासनाकडून निधीच न आल्याने ही रक्कम जमा न झाल्याचे बँकेकडून सांगण्यात येत असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: 55 thousand farmers in Kolhapur district awaiting incentive subsidy; 150 crores required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.