राज्य सरकारची जाहिरातींवर ५५० कोटी रुपयांची उधळपट्टी, आमदार रोहित पवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:38 PM2024-10-14T17:38:11+5:302024-10-14T17:59:48+5:30
इचलकरंजी : राज्यावर ४० ते ५० हजार कोटी रुपयांची उधारी आहे. असे असाताना देखील राज्य सरकारने जाहिरातींवर ५५० कोटी ...
इचलकरंजी : राज्यावर ४० ते ५० हजार कोटी रुपयांची उधारी आहे. असे असाताना देखील राज्य सरकारने जाहिरातींवर ५५० कोटी रुपये उधळले आहेत, असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.
येथील जवाहरनगरमध्ये श्रीराम ट्रस्टच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पवार म्हणाले, महागाई व भ्रष्टाचार वाढवणारा विचार येत्या विधानसभेला पराभूत करायचा आहे. राज्याच्या राजकारणात ५० हा आकडा महत्त्वाचा आहे. तो भ्रष्टाचाराचा प्रतिकही आहे. त्यामुळे ५० फुटी रावण दहन करायचे आहे. समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. जनतेच्या हाताला काम, पोटाला अन्न आणि पुरोगामी विचाराची गरज आहे. देशातील राजकारणामध्ये नेत्यांचे भले होते. मात्र, सामान्यांचे भले होत नाही.
मदन कारंडे यांनी, यापूर्वी शहरामध्ये राजाराम मैदानावर होत असलेल्या रावण दहन कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख केला. माजी आमदार राजीव आवळे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचे सांगितले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रावण दहन व सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राहुल खंजिरे, सुहास जांभळे, अब्राहम आवळे, राजू आलासे, सयाजी चव्हाण, गणेश पवार, मंगेश कांबुरे, नितीन कोकणे, दशरथ माने, मदन जाधव, आदी उपस्थित होते.
लक्षवेधी देखावे
५१ फुटी रावणाबरोबरच दसऱ्याच्या या कार्यक्रमानिमित्त राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ताशांच्या कडकडाटात तुतारीचा आवाज आणि राम-कृष्ण-हरीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.