५५७ प्राथमिक शाळा डिजिटल

By admin | Published: December 10, 2015 12:31 AM2015-12-10T00:31:12+5:302015-12-10T00:53:20+5:30

जिल्हा परिषद : अध्यापन सुलभ होण्यासाठी होतेय मदत...

557 Elementary School Digital | ५५७ प्राथमिक शाळा डिजिटल

५५७ प्राथमिक शाळा डिजिटल

Next

रत्नागिरी : विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू असून, अध्ययन व अध्यापनामध्येही त्याचा वापर वाढला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बुध्दिमत्ता, आकलन क्षमता भिन्न आहे. दृकश्राव्य माध्यमामुळे विद्यार्थ्यांना आकलन लवकर होत असल्यामुळे अध्यापन सुलभ होत आहे. डोळे व कान ही दोन्ही इंद्रिये पडद्याकडे केंद्रीत असल्याने अध्यापनाची उत्सुकता वाढते, शिवाय आकलनही लवकर होते. रत्नागिरी जिल्ह्यातील २७३९पैकी ५५७ शाळा डिजिटल झाल्या आहेत.डिजिटल म्हणजे एलसीडी प्रोजेक्टर व टॅबचा वापर करून विद्यार्थांना ‘ई - लर्निग’ पध्दतीने अध्यापन करण्यात येते. कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये टॅब सुविधा उपयुक्त ठरत आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये एक टॅब दिला जातो. जिल्ह्यातील ४४० शाळांमध्ये टॅब देण्यात आला आहे. तसेच ११७ शाळांमध्ये एलसीडी प्रोजेक्टर देण्यात आला असून, त्याव्दारे ई - लर्निंग करण्यात येत आहे. काही शाळांनी संगणक बसविले आहेत. खासगी शाळामध्ये तर खासगी कंपन्यामार्फत सुरू करण्यात आलेली ई - लर्निंग प्रणालीसर्व्हरव्दारे जोडण्यात आली आहे.सर्व्हरव्दारे प्रत्येक वर्गात पडदा व मॉनिटर जोडण्यात आले आहे. स्टाफरूममध्ये सर्व्हर बसवण्यात आलेला असतो. जो टॉपिक शिकवायचा असेल त्याची तयारी आधी करून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी मॉनिटर सुरू करून वर्गामध्ये त्या विषयाचे अध्यापन सुरू केले जाते. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे आकलन चटकन होते.
साहित्य असो वा विज्ञान, इतिहास असो वा भूगोल, संबंधित विषयाची माहिती व त्याबद्दल सर्व माहिती ई - लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येते. एकूणच एखादा विषय समजावण्यासाठी एक ते दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक तास लागत असतील, तर या प्रणालीमुळे तोच विषय ३० ते ४० मिनिटात शिकवता येतो. वाचून किंवा समजावूनसुध्दा कळत नाही, त्या विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाचा फायदा होत आहे. रत्नागिरी शहरातील खासगी शाळांमध्ये या प्रणालीचा वापर चार वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ई - प्रणाली वापर गतवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. हळूहळू ही प्रणाली सर्व शाळांमध्ये सुरू होणार आहे. या प्रणालीव्दारे कोणत्याही विषयाचे अध्यापन करीत असताना संबंधित विषयाची अधिकची माहिती व चित्र दाखवण्यात येतात. साहित्याचे अध्यापन करताना संबंधित लेखक त्याचे कार्य, अन्य साहित्य याबाबत माहिती देण्यात येते. जेणेकरून चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे तो विषय विद्यार्थ्यांना चटकन आकलन होण्यास मदत होते.
पुस्तकामध्ये एखाद्या विषयाचे एखाददुसरे चित्र असते. मात्र, ई - लर्निंगमध्ये हजारो चित्र दाखवता येतात, त्यामुळे संबंधित अध्यापन प्रणाली उपयुक्त ठरत आहे.(प्रतिनिधी)

ई-लर्निंग प्रणाली : अधिकाधिक शाळा जोडल्या जाणार
जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये ई - लर्निंग प्रणालीअंतर्गत ११७ शाळांतून एलसीडी प्रोजेक्टर बसवण्यात आले आहेत, तर ४४० शाळांना टॅबव्दारे ई - लर्निंगचे धडे देण्यात येत आहेत. ज्ञानरचना वादानुसार १२८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरचा वापर करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्ता अभियानांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अधिकाधिक शाळा ई-लर्निंगव्दारे जोडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

सुलभ प्रणाली
छोट्या मुलांना चित्राव्दारे शिकवल्यास ते चटकन आकलन करतात. शिवाय विद्यार्थ्यांनाही त्यामध्ये गोडी निर्माण होते. ई-लर्निंग प्रणालीमध्ये एखाद्या विषयाची हजारो चित्र दाखवता येत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही गोडी निर्माण झाली आहे.

Web Title: 557 Elementary School Digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.