कोल्हापूर जिल्ह्यातील ५५७ गावांत उद्या वनमित्र मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:07 PM2018-09-03T18:07:43+5:302018-09-03T18:09:23+5:30
वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, वनमित्र मोहिमेस संबंधित गावांतील ग्रामसेवक, तलाठी तसेच वनहक्क समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६, नियम २००८ सुधारित नियम २०१२ तील तरतुदीची माहिती संबंधितांना दिली जाईल. तसेच या कायद्यान्वये ज्यांना दावे दाखल करावयाचे असतील त्यांचे दावे स्वीकारले जातील.
विजय देसाई म्हणाले, गगनबावडा, करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड या आठ तालुक्यांमधील ५५७ गावांत वनजमिनी आहेत. या गावांतील ५२५ वनहक्क समित्या गठीत झाल्या असून, आजअखेर ७४४ लाभार्थ्यांना वनहक्क जमिनी दिल्या आहेत. ६४० एकर जमिनींचे हक्क दिले असून, त्याच्या नोंदी सातबारावर घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाच उपविभागात गावपातळीवर दावे तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, वैयक्तिक दाव्यांची संख्या चारशे ते पाचशेपर्यंत जाईल.
जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे समन्वयक डी. के. शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक व भौगोलिक स्थितीचा विचार करून व गावातील वनजमिनीचे क्षेत्र व त्यामधील इतर पारंपरिक सन निवासींचे वाडे विचारात घेता संबंधित वाड्यांवरच्या इ.पा.व.नि.ना. वनकुरण, मत्स्य संगोपन व मच्छिमारी यासाठी सामूहिक दावे करता येतील, ते त्यांनी करावेत. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या दीप्ती सिंग, स्मिता संकपाळ, आदी उपस्थित होते.