तेरा दिवसांत ५६ कोटींचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:23+5:302021-03-19T04:23:23+5:30
कोल्हापूर : घरफाळा, पाणीपट्टी विभागांना वसुलीसाठी केवळ १३ दिवसांत ५६ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य आहे. परिणामी घरफाळा विभागाने मिळकती जप्तीची ...
कोल्हापूर : घरफाळा, पाणीपट्टी विभागांना वसुलीसाठी केवळ १३ दिवसांत ५६ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य आहे. परिणामी घरफाळा विभागाने मिळकती जप्तीची नोटीस, तर पाणीपुरवठा विभागाने कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. पाणीपट्टी विभागाने सरकारी कार्यालयांची थकबाकी वसुली करणे, तर घरफाळा विभागाने ‘टॉप’च्या १०० थकबाकीदारांसह २० कोटींची वसुली करण्यास प्राधान्य दिले आहे.
महापालिकेची सर्व यंत्रणा कोरोना उपाययोजना, कोरोना लसीकरण, निवडणूक कामकाज, अंदाजपत्रक तयार करणे अशा महत्त्वाच्या कामांत गुंतली असतानाच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचीही त्यांच्यासमोर महत्त्वाची जबाबदारी आहे. घरफाळा, पाणीपट्टी विभाग हे महत्त्वाचे विभाग आहेत.
चौकट
पाणीपट्टी विभागाची स्थिती
गतवर्षीची उद्दिष्टे : ६५ कोटी ६३ लाख
वसुली : ४१ कोटी ८३ लाख
यंदाची उद्दिष्टे : ६९ कोटी ५० लाख
आतापर्यंतची वसुली : ३९ कोटी २९ लाख
चौकट
सरकारी कार्यालयांची २१ कोटींची पाणीपट्टी थकबाकी
सरकारी कार्यालयांची तब्बल २१ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. रेल्वेची सर्वाधिक १ कोटी ९७ लाखांची थकबाकी आहे. १२ ग्रामपंचायती ६ कोटी, सीपीआर ८ कोटी, बांधकाम विभाग ७१ लाख ३६ हजार, शिवाजी विद्यापीठ ६६ लाख ३८ हजार, जिल्हाधिकारी कार्यालय २४ लाख ९७ हजार, जिल्हा परिषद १८ लाख ४८ हजार, टेलिफोन विभाग १७ लाख ५९ हजार रुपयांची थकबाकी आहे.
चौकट
सवलत योजनेमुळे १ कोटींची वसुली
पाणीपट्टी थकबाकी जमा होण्यासाठी दंडव्याजात सवलत योजना सुरू केली आहे. १ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत १ कोटी ६१ लाखांची वसुली झाली असून १५ लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. ११ लाख २८ हजार रुपयांची सवलत दिली असून, ९ हजार १०२ पाणीपट्टीधारकांनी याचा लाभ घेतला.
चौकट
पाण्याची ४०० कनेक्शन तोडली
पाणीपुरवठा विभागाने गेल्या पाच महिन्यांत थकबाकीसाठी ४०० कनेक्शन तोडली. यामधून ४ कोटी ८६ लाखांची वसुली झाली आहे. पाच पथकांमार्फत वसुली मोहीम सुरू आहे.
चौकट
घरफाळा विभागाची गतवर्षीचे उद्दिष्टे : ७९ कोटी
वसुली : ४३ कोटी
यंदाचे उद्दिष्टे : ७९ कोटी ५८ लाख
आतापर्यंत वसुली : ५३ कोटी ४२ लाख
दंड व्याज सवलतमधून वसुली : १२ कोटी ६८ लाख
जप्तीच्या नोटीस बजावलेल्या मिळकती : ४५०
चौकट
घरफाळा वसुलीसाठी टॉप १०० मिळकती टार्गेट
शहरातील टॉपच्या १०० थकबाकीदार मिळकती घरफाळा विभागाच्या लक्ष्य आहेत. त्यांच्याकडून १५ कोटींचा घरफाळा थकबाकी आहे.
आतापर्यंत पाणीपट्टी थकबाकी प्रकरणी ४०० कनेक्शन तोडण्यात आली असून या माध्यमातून ४ कोटींची वसुली झाली आहे. घरफाळा विभागाकडून ४५० मिळकतधारकांना थकबाकी जमा नोटीस बजावली आहे.