आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:30 PM2023-12-18T12:30:51+5:302023-12-18T12:31:09+5:30

कोल्हापूर : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया ...

56 crores of attractive returns; Three people of Maker Group arrested in Kolhapur | आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक

आकर्षक परताव्याची थाप, ५६ कोटींचा गंडा; कोल्हापुरात 'मेकर ग्रुप'च्या तिघांना अटक

कोल्हापूर : आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया कंपनीच्या तिघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. नारायण पांडुरंग खरजे (रा. कळंबोली, मुंबई), गौतम हरिदास माने (रा. हरेगाव, ता. औसा, जि. लातूर) आणि माधव निवृत्ती गायकवाड (वय ४९, रा. सासनेनगर, हडपसर, पुणे) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता, तिघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली.

मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधित कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीचे काही वर्षे परतावे दिल्यानंतर पुढे कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीच्या संचालकांनी पोबारा केला. याबाबत डिसेंबर २०१८ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असून, या शाखेच्या पथकाने तीन संशयितांना अटक केली. तिन्ही संशयितांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यांचा मेकर कंपनीतील सहभाग, त्यांना कंपनीकडून मिळालेले लाभ आणि त्या पैशांतून खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती घेतली जात आहे. अटकेतील तिन्ही संशयितांच्या अन्य साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

या गुन्ह्यातील प्रमुख संशयित रमेश महादेव वळसे-पाटील (रा. आकुर्डी, जि. पुणे) याच्यासह तीन संशयितांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. गेल्या पाच वर्षांपासून गुन्हा दाखल असला तरी, तपासाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचा तपास गतिमान करण्याच्या सूचना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या आहेत.

Web Title: 56 crores of attractive returns; Three people of Maker Group arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.