तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:39 PM2024-07-10T16:39:32+5:302024-07-10T16:39:53+5:30
देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर : गावात, शेत-शिवारात तुटलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन आणि खांबांमध्ये वीज उतरून झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या दीड वर्षांत ५८ जणांनी प्राण गमावला. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुटलेल्या विद्युत तारा मृत्यूचे सापळे ठरत आहेत. वाढत्या अपघातांमुळे महावितरणच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वादळी वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या पडून विजेच्या तारा तुटतात. जमीन खचल्याने विजेचे खांब कलतात. जीर्ण झालेल्या तारा तुटून शेतात पडल्याने दुर्घटना घडतात. जानेवारी २०२३ ते ८ जुलै २०२४ या कालावधीत जिल्ह्यात विजेच्या तारांचा स्पर्श होऊन ५८ जणांनी जीव गमावला.
गेल्या आठ दिवसांत तीन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोघे सख्खे भाऊ ठार झाले. नागाव (ता. हातकणंगले) येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर वडणगे (ता. करवीर) येथे शेतात बांधावरील गवताला खत टाकण्यासाठी गेलेला तरुण विजेच्या धक्क्याने ठार झाला.
या तिन्ही घटनांमध्ये शेतात पडलेल्या विद्युत तारा शेतकऱ्यांना दिसल्याच नाहीत. उसाची शेती, वाढलेेले गवत, झाडी यामुळे पडलेल्या तारा लक्षात येत नाहीत. पावसामुळे साचलेले पाणी आणि ओलसर हिरव्या वनस्पतींमुळे हा धोका आणखी वाढतो. अशा दुर्घटना रोखण्यासाठी महावितरणला तातडीने ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसेच नागरिकांनाही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
दुरुस्ती होते की नाही?
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत खांब, तारा, डीपी यांची तपासणी केली जाते. जीर्ण खांब आणि तारा बदलल्या जातात. अडथळे ठरणाऱ्यांच्या झाडांची छाटणी केली जाते. विद्युत प्रवाहात बिघाड निर्माण होताच पुरवठा खंडित होण्यासाठी सर्किट ब्रेकर्स, रिलेज, फ्यूज यांचा वापर केला जातो. मात्र, त्यानंतरही दुर्घटनांची संख्या वाढत असल्याने दुरुस्तीच्या कामांबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
कुटुंबीयांना चार लाखांची मदत
महावितरणच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृताच्या नातेवाइकांना चार लाख, तर जखमीला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा पंचनामा होणे गरजेचे असते.
खबरदारी घेणे गरजेचे
शेतात विजेचे खांब असल्यास शेतकऱ्यांनी तारांचा अंदाज घ्यावा. वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा दिसताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. स्वत:हून तारा हटवण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत. विद्युत पंप हाताळताना किंवा चालू करताना रबरी हातमोजे, गमबूट वापरावेत असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.