‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

By admin | Published: December 4, 2015 12:17 AM2015-12-04T00:17:58+5:302015-12-04T00:22:59+5:30

प्रशासनाने दिल्या आॅर्डर : नेत्यांच्या विरोधाला केराची टोपली; संचालकांची मुले, नातेवाइकांना संधी दिल्याची चर्चा

580 workers jumbo recruitment in Bhogavati | ‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

‘भोगावती’त ५८० कामगारांची जंबो भरती

Next

तानाजी पोवार-- कोल्हापूर--साखर कारखानदारी अडचणीत असताना परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यात तब्बल ५८० जणांची जंबो नोकरभरती गुरुवारी करण्यात आली. शासनाचा व नेत्यांचाही आदेश डावलून भरतीच्या आॅर्डर्स देण्यात आल्या असून यातही संचालकांच्या सग्या-सोयऱ्यांचा भरणा केल्याचे समजते. या नोकरभरतीमुळे कारखान्यावर साहजिकच मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी मात्र रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली असल्याचे सांगितले. कारखान्यावर राष्ट्रवादी व शेकापची सत्ता असून कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर यांचे नातू धैर्यशील पाटील यांच्याकडे गेली पाच वर्षे अध्यक्षपद आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती व साखरेचे पडलेले दर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे भाव देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत साखर कारखान्यात जंबो नोकरभरती करणे म्हणजे आर्थिक संकटात ओढण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करताना प्रादेशिक साखर सहसंचालक व साखर आयुक्तांंची परवानगी आवश्यक असते; पण चार महिन्यांपूर्वी साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकरभरतीबाबत दिलेल्या पत्राला या सत्तारूढांनी केराची टोपली दाखविली आहे.
कारखान्यावर काँग्रेसची सत्ता असताना २००९ साली भरती करण्यात आलेल्या ७० रोजंदारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी-शेकापची सत्ता आल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला डावलून नव्याने नोकरभरती करू नये, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालकांनी नव्याने नोकरभरती करणार नसल्याचे लेखी आश्वासन साखर आयुक्तांना दिले होते; पण तीन वर्षांपूर्वी कारखान्यात नोकरभरतीचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले; त्यावेळी नोकरभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेमुळे अध्यक्षांनी या भरतीला ‘खो’ घातला होता, पण त्यानंतर गुरुवारी भरतीच्या थेट आॅर्डर्सच उमेदवारांना दिल्याने खळबळ उडाली आहे.


विद्यमान संचालकांना कारखान्यात नव्याने नोकरभरती करता येत नाही. असे पत्रही साखर सहसंचालकांनी यापूर्वी प्रशासनाला दिलेले आहे. या कारखान्यातील संचालकांची मुदत यापूर्वीच संपली आहे; त्यामुळे अशा पद्धतीने नोकरभरतीचा निर्णय ते कोणालाही न जुमानता घेत आहेत; या नोकरभरतीला आम्ही विरोध करु. -पी. एन. पाटील, माजी आमदार,
विरोधी आघाडीचे नेते


सध्या साखर कारखानदारी अडचणीतून जात आहे. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे पैसे देताना दमछाक होत आहे. भोगावती कारखान्याची स्थितीही नाजूक आहे. अशा स्थितीत वाढीव कर्मचाऱ्यांना पगार देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे नोकरभरतीला यापूर्वीही विरोध होता. तो आजही कायम आहे.
-हसन मुश्रीफ, आमदार, सत्तारुढ राष्ट्रवादीचे नेते


नोकरभरतीसाठी पत्रे दिली आहेत हे खरे आहे; पण कारखान्यात काही कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सुमारे ४०० जागांवरच ही भरती केली आहे. कारखान्यात गेली पाच वर्षे हंगामी म्हणून सेवेत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाच कायम सेवेत घेतले आहे; पण यासाठी कारखान्यावर किरकोळ प्रमाणातच आर्थिक बोजा पडणार आहे. -एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, ‘भोगावती’


पाच महिन्यांपूर्वीच भोगावती कारखान्यास नव्याने नोकरभरती करू नये, असे लेखी कळविले होते. नव्याने नोकरभरती होत असल्याच्या चर्चेने आमचे लेखापरीक्षक कारखान्यावर तळ ठोकून त्याबाबत माहिती घेत आहेत; पण नव्याने भरतीच्या आॅर्डर कोणाला दिल्या असतील तर त्याची मला काहीही माहिती नाही. आमचे लेखापरीक्षक अहवाल देतील. त्यानंतर कारवाई करू.
-सचिन रावळ, प्रादेशिक साखर सहसंचालक

Web Title: 580 workers jumbo recruitment in Bhogavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.