नव्या सभागृहात तब्बल ५९ नवे चेहरे
By Admin | Published: November 4, 2015 12:40 AM2015-11-04T00:40:26+5:302015-11-04T00:40:59+5:30
कोल्हापूर ‘तरुण’ महापालिका : अनेकांचा नामुष्कीजनक पराभव; २९ उमेदवारांनी मतांची शंभरीही गाठली नाही
विश्वास पाटील = कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एकूण ८१ पैकी तब्बल ५९ प्रभागांतून मतदारांनी नव्या व बहुतांशी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्या अर्थाने महापालिकेचे नवे सभागृह तरुण बनले आहे. पाच प्रमुख पक्षांकडून रिंगणात उतरलेल्या तब्बल २९ उमेदवारांना मतांची किमान शंभरीही गाठता आलेली नाही. त्यातील प्रमुखांमध्ये राष्ट्रवादीचे रामेश्वर पत्की, नितीन पाटील व रिपब्लिकन पक्षाचे अशोक भंडारे यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत सर्वच पक्षांना उमेदवार शोधताना घाम फुटला. त्यातही शिवसेना व काँग्रेसची तर फारच दमछाक झाली. कारण राष्ट्रवादीचे मावळत्या सभागृहात २५ विद्यमान नगरसेवक होते. त्याशिवाय जनसुराज्यचे चार होते. त्यामुळे किमान २९ प्रभागांत त्यांना ताकदीचे उमेदवार हवे होते. काँग्रेसचे मावळत्या सभागृहात ३१ नगरसेवक असले, तरी यावेळेला आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे हे काँग्रेससोबत नव्हते. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या खांद्यावरच सर्व धुरा होती. या पक्षाला अनेक प्रभागात नवीन उमेदवार शोधावे लागले. नवीन उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसला तब्बल १९ प्रभागांत विजय मिळाला आहे. यातील काही उमेदवार जयश्री चव्हाण, इंदुमती माने अशा होत्या की, त्यांचे घराणे प्रस्थापित आहे; परंतु छाया पोवार, लाला भोसले, रिना कांबळे, वनिता देठे, प्रवीण केसरकर असे काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले.
राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक निवडून आले असले, तरी त्यातील ११ नवे चेहरे आहेत. शिवसेनेकडूनही चारही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. भाजपचे तीन सदस्य होते. त्यातील आर. डी. पाटील यांचा पत्ता अर्ज भरतानाच कट झाला. त्यांनी मुलगीला मैदानात उतरविले. प्रभा टिपुगडेंना पक्षाने थांबविले. सुभाष रामुगडे यांचा प्रभाग बदलल्याने त्यांनी पत्नीला संधी दिली; परंतु या तीनपैकी दोन्ही ठिकाणी पक्ष पराभूत झाला.
ताराराणी आघाडीने पुनरागमन करताना २० जागा खेचून घेतल्या. त्यातील १२ उमेदवार नवखे आहेत. तिन्ही अपक्षांचेही तसेच आहे. भाजप व ताराराणी आघाडीचा एकही उमेदवार शंभर मतांच्या आत नाही. कारण त्यांनी निम्म्या जागा लढविल्या होत्या. जिथे भाजपला उमेदवार नाही तिथे महाडिक गटाचे कार्यकर्ते ‘कमळ’ चिन्हावर लढत होते.
पक्षांना मिळालेली मते व जिंकलेल्या जागा
२०१५ २०१०
पक्षमतेजागामते जागा
काँग्रेस७१,७०४२७ ८७,१४८३१
राष्ट्रवादी६०,८६६१५ ६५,४९५२५
ताराराणी५१,४४९१९ रिंगणात नव्हती
भाजप४३,५६३१३ १३,१०५ ०३
शिवसेना ४३,७७७०४ ३९, ०२४०४
अपक्ष२८,८३७०३ ५१,६३९०९
प्रा. जयंत पाटील यांच्या प्रभागात...
राजेंद्रनगर प्रभाग हा प्रा. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला. ते शब्द टाकतील तोच उमेदवार विजयी होणार असे चित्र; परंतु यावेळेला मतदारांनी त्यांचा उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीच्या मुश्ताक मलबारी यांचा पराभव केला. प्रा. पाटील यांनी स्वत:हून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. काँग्रेसकडून ऐनवेळी निवडणूक लढवून तिथे लाला भोसले विजयी झाले.
पत्की, भंडारेंच्या मतांची चर्चा
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रामेश्वर पत्की यांना तटाकडील तालीम प्रभागातून अवघी ९२ मते मिळाली. याच पक्षाचे पदाधिकारी असलेल्या नितीन पाटील यांचीही अवस्था त्याहून वाईट झाली. त्यांना दौलतनगर प्रभागातून ७७ मते मिळाली. काँग्रेसचे कार्यकर्ते; परंतु आता रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अशोक भंडारे यांना राजेंद्रनगर प्रभागातून फक्त ६९ मते मिळाली. भंडारे काढत असलेल्या मोर्चातही त्यांना मते मिळालेल्या संख्येपेक्षा जास्त महिला असतात.
याचीही चर्चा...
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या तपोवन प्रभागातून भाजपचे विजयसिंह खाडे विजयी झाले; परंतु त्यांच्या आड्याल असलेल्या कळंबा फिल्टर हाऊस व पड्याल असलेल्या राजलक्ष्मीनगर प्रभागातून भाजपचा पराभव झाला. दादांच्या आड्याल-पड्याल काँग्रेसचा झेंडा लागल्याची चर्चा होती.
पंधरा जागांवर भाजप-ताराराणी-शिवसेना वरचढ
भाजप, ताराराणी आघाडीस महापालिकेत सत्तेजवळ पोहोचण्यात ८ जागा कमी पडल्या. शिवसेनेला सोबत घेतल्यास त्यांचे चार सदस्य आहेत. त्यामुळे भाजपला फक्त चारच जागा कमी पडतात; परंतु हेच जर या तिन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केली असती, तर दोन्ही काँग्रेसचा धुव्वा उडाला असता. कारण आता १५ प्रभागांत दोन्ही काँग्रेसच्या विजयी उमेदवारांपेक्षा भाजप-शिवसेना किंवा ताराराणी आघाडी-शिवसेना यांची एकत्रित मते जास्त आहेत.
सभागृहात ‘मनसे’ म्हणूनच राहणार
आपटेनगर-तुळजाभवानी नगर प्रभागातून अपक्ष म्हणून ‘मनसे’चे राजू दिंडोर्ले यांनी बाजी मारली. ते मंगळवारी भाजप-ताराराणी आघाडीच्या मेळाव्यास उपस्थित असल्याची चर्चा होती. याबाबत दिंडोर्ले म्हणाले, सभागृहात ‘मनसे’ चा प्रतिनिधी म्हणून राहणार आहे. त्यामुळे इतर पक्षांचा विचार करणार नाही.