पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षा एप्रिलमध्ये शाळा स्तरावर
By भीमगोंड देसाई | Published: March 12, 2024 08:48 PM2024-03-12T20:48:59+5:302024-03-12T20:49:19+5:30
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश : शासन आदेशानुसार आयोजनाच्या सूचना
कोल्हापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यता प्राप्त शाळांनी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घ्याव्यात. सर्व शाळांनी आपल्या स्तरावर परीक्षेचे आयोजन करावे, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले.
परीक्षा व्दितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहेत. वार्षिक परीक्षांसाठी पाचवीला प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा, गणित व परिसर अभ्यास हे विषय असतील. इयत्ता आठवीसाठी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असणार आहेत. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन दोन म्हणजेच वार्षिक परीक्षा असणार आहे. परीक्षेसाठी प्रत्येक शाळेने शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करुन परीक्षा घ्यावयाची आहे. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या mss.ac.in या संकेत स्थळावर पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करुन दिलेले आहेत. याचा उपयोग करुन प्रश्नपत्रिका तयार कराव्यात.
पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुर्नपरीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. पुनर्परीक्षेचे आयोजन देखील शासन आदेशानुसारच संबंधीत शाळांनी करावयाचे आहे.
दरम्यान, शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषासाठी (एकूण १० माध्यम) तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन एकचे आयोजन करण्यात आले आहे. संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन २, ३, ४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.