जयंती नाला परिसरातून सहा डंपर कचरा जमा, महास्वच्छता अभियानास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:50 AM2019-06-24T11:50:49+5:302019-06-24T11:53:10+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्यान जयंती नाला परिसरात हे महास्वच्छता अभियान राबविले, यामध्ये सुमारे सहा डंपर कचरा गोळा करण्यात आला. रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून राबविलेल्या महास्वच्छता मोहिमेत सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. मोहिमेच्या नवव्या रविवारी लक्ष्मीपुरी ते सिद्धार्थनगर या दरम्यान जयंती नाला परिसरात हे महास्वच्छता अभियान राबविले, यामध्ये सुमारे सहा डंपर कचरा गोळा करण्यात आला. रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूचीही यावेळी स्वच्छता करण्यात आली.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी या महास्वच्छता अभियानावर नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.
सकाळी लक्ष्मीपुरी येथील कोरे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या जयंती नाल्यामध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला, तर शाहूपुरी कुंभार गल्लीतील जयंती नाल्यातील गाळ जेसीबी मशीनद्वारे बाहेर काढण्यात आला.
यावेळी पुणे उपजिल्हाधिकारी अशोक पाटील, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा. आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, नारायण भोसले, आर. के. पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर, दिलीप देसाई, कॉ. दिलीप पोवार, कोल्हापूर क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, महापालिकेच्या सर्व विभागाकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
नाल्यातील या मार्गावरील हटविला कचरा
महापालिकेच्या वतीने लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल पिछाडीस ते रिलायन्स मॉल पिछाडीस, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, संप आणि पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या जयंती नाला परिसरातील कचरा हटविला, तर रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजंूची स्वच्छता करण्यात आली.
लहान मुलांचा सक्रिय सहभाग
दसरा चौक येथील मैदानाची वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या मोहिमेसाठी कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वांना हँडग्लोज पुरविण्यात आले.
हिरवा, पिवळा गणवेश
स्वच्छता मोहिमेत वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने पिवळा टि शर्ट घालून मुलांनी व युवकांनी सहभाग घेतला, तर ‘अवनि’ संस्थेच्या महिलांनी हिरव्या साड्या परिधान करून स्वच्छता मोहिमेला हातभार लावला.
संस्थांचा सहभाग
मोहिमेत असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट, क्रिडाई कोल्हापूर, वृक्षप्रेमी ग्रुप, प्रजासत्ताक संस्था यांच्यासह ‘अवनि’, ‘एकटी’, ‘भावना रात्रनिवारा’ या संस्थेच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.