ऑपरेशन ऑलआऊटमध्ये ६ फरार, ४ हद्दपार लागले हाती; ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई 

By उद्धव गोडसे | Published: January 1, 2024 07:12 PM2024-01-01T19:12:05+5:302024-01-01T19:12:23+5:30

पोलिसांचे थर्टी फर्स्ट रस्त्यावरच

6 fugitives, 4 deportees detained in Operation All Out, Kolhapur police action in the background of December 31 | ऑपरेशन ऑलआऊटमध्ये ६ फरार, ४ हद्दपार लागले हाती; ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई 

ऑपरेशन ऑलआऊटमध्ये ६ फरार, ४ हद्दपार लागले हाती; ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई 

कोल्हापूर : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात ऑलआऊट ऑपरेशन राबविले. या कारवाईत पोलिसांच्या रेकॉर्डवरील १०२ गुन्हेगारांची झडती घेण्यात आली. विविध गुन्ह्यांत फरार असलेले सहा आरोपी पोलिसांना सापडले, तर हद्दपारीचा भंग केलेले चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. जिल्ह्यात ७३ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये पाच हजार २०७ वाहनांची तपासणी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रविवारी (दि. ३१) दुपारपासूनच जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. ७३ ठिकाणी नाकाबंदी करून पाच हजार २०७ वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील १३३ मद्यपी वाहनचालक आणि ३७ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीवर छापा टाकून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान चार हद्दपार आरोपी पोलिसांना सापडले, तर सहा फरार आरोपींनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या संशयितांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. १४५ हॉटेल्स, १०३ लॉज आणि ३७ गेस्टहाऊसही तपासण्यात आले. सोमवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केल्यामुळे कुठेही अनूचित प्रकार घडला नाही, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.

पोलिसांचे थर्टी फर्स्ट रस्त्यावरच

सर्व नागरिक नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना पोलिस मात्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर थांबून कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करीत होते. स्वत: पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह सहा उपअधीक्षक, सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, वाहतूक शाखा यांच्यासह ७० अधिकारी आणि ३३५ पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर होते. त्यांनी कर्तव्य बजावतच नव्या वर्षाचे स्वागत केले.

Web Title: 6 fugitives, 4 deportees detained in Operation All Out, Kolhapur police action in the background of December 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.