Kolhapur: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक; वकिलासह पाच जणांवर गुन्हा, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:07 IST2025-02-27T13:07:00+5:302025-02-27T13:07:19+5:30
संशयितांनी नोटरी करून पैसे परत देण्याची हमी दिली

Kolhapur: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक; वकिलासह पाच जणांवर गुन्हा, एकास अटक
कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्यावर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी अरुण शिवाजी पाटील (वय ३८, रा. साबळेवाडी, ता. करवीर) यांची सहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला.
पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिवाजी बाबूराव घेवडे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी), ॲड. सारंग, भिकाजी कुराडे, भिकाजी नामदेव कुराडे (दोघे रा. चंदूर, ता. हातकणंगले), मुर्जुता उर्फ सोनू मन्सूर नायकवडी (वय २६, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) आणि मेहरून सरकवास, (रा. बेळगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यातील सोनू नायकवडी याला पोलिसांनी अटक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी पाटील यांना शेअर ट्रेडिंगमधून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार पाटील यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. रक्कम देऊन अनेक दिवस उलटले तरी परतावा मिळत नसल्याने पाटील यांनी मुद्दल परत मागितली. संशयितांनी नोटरी करून पैसे परत देण्याची हमी दिली.
मात्र, प्रत्यक्षात पैसे परत दिलेच नाहीत. संबंधित रक्कम बेळगाव येथील मेहरून सरकवास हिच्याकडे दिल्याची माहिती मिळताच फिर्यादी पाटील यांनी सरकवास हिची भेट घेतली. तिनेही पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर पाटील यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने सोनू नायकवडी याला अटक केली. त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
चंदूरच्या वकिलाचा समावेश
चंदूरचा वकील सारंग कुराडे आणि त्याचे वडील भिकाजी कुराडे या दोघांचा गुन्ह्यात समावेश आहे. भिकाजी कुराडे याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी इतर सहकाऱ्यांसह लक्ष्मीपुरीतील विजय हाईट्स येथे एका वकिलाच्या कार्यालयात बसून फिर्यादींची फसवणूक केली.