गड, किल्ल्यावर दारू प्याल, तर ६ महिने जेलमध्ये जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:44 PM2023-08-05T12:44:13+5:302023-08-05T12:45:48+5:30
१० हजार रुपये दंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली माहिती
कोल्हापूर : राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असून, त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरशिस्तीने वागल्यास ६ महिने कारावास व १० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील गड, किल्ले हे एक शौर्याचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास लाभला आहे. तो नव्या पिढीला स्फूर्तिदायक सुद्धा आहे. परंतु अशा गड, किल्ल्यांवर अनेकदा मद्यपान करून गोंधळ घातला जातो, हुल्लडबाजी केली जाते. अनेकदा गंभीर गुन्ह्यांसारखे प्रकार घडतात. गड, किल्ल्यांवर पर्यटकांनी मद्यपान करून गैरशिस्त वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
ज्यांनी या गड, किल्ल्यांचे पावित्र्य राखायचे त्यांच्याकडूनच त्याला काळिमा फासण्याचे काम होत असल्यामुळे आता याबाबत यापुढे कठोर कारवाई होणार आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार पहिल्यांदा अपराध केल्यास ६ महिन्यापर्यंत सश्रम कारावास व १० हजार रुपयापर्यंत दंड, अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या पुन्हा अपराध केल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. पर्यटकांनी आपले गड, किल्ले पवित्र राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आवळे यांनी केले आहे.