राज्यातील ५६ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:53 PM2020-03-17T14:53:46+5:302020-03-17T14:57:14+5:30
राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ५६ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप करत पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
गतवर्षी नऊ कोटी ५१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत गाळप अद्याप निम्म्यावर असून, अद्याप ९० कारखाने सुरू असले तरी गाळपाचा टप्पा पूर्ण होणे कठीण आहे.
गेल्या हंगामात राज्यातील १०२ सहकारी व ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला होता.
मे २०१९ पर्यंत गाळप हंगाम सुरू राहून नऊ कोटी ५१ लाख ७९ हजार टन उसाचे गाळप झाले होते. मात्र यंदा महापूर, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने ऊस उत्पादकांचे कंबरडे मोडले होते. उसाचा तुटवडा व आर्थिक अडचणीमुळे यंदा तब्बल ४९ कारखाने सुरूच झाले नाहीत.
सर्वाधिक फटका सोलापूर विभागातील १६, तर अहमदनगर विभागातील १२ कारखान्यांना बसून त्यांची धुराडी पेटू शकली नाहीत. त्याचा परिणाम उसाच्या गाळपावर दिसत असून, १५ मार्च २०२० पर्यंत १४६ कारखान्यांनी पाच कोटी एक लाख टन उसाचे गाळप होऊन पाच कोटी ५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मागील दोन हंगामातील उसाचे गाळप व साखरेचे उत्पादन पाहता आतापर्यंत निम्म्यावर गाळप राहिले आहे. उर्वरित कालावधीत मागील वर्षीच्या जवळपासही गाळप जाण्याची शक्यता धूसर आहे.
विभागनिहाय उसाचे गाळप टनात
विभाग हंगाम २०१८-१९ हंगाम २०१९-२०
- कोल्हापूर २ कोटी १५ लाख ९९ हजार १ कोटी ७४ लाख ८० हजार
- पुणे २ कोटी ६ लाख ७० हजार १ कोटी ३२ लाख ४१ हजार
- सोलापूर २ कोटी ३ लाख ५० हजार ६७ लाख ५९ हजार
- अहमदनगर १ कोटी ४८ लाख ६ हजार ५५ लाख २७ हजार
- औरंगाबाद ८८ लाख ७३ हजार ३५ लाख १८ हजार
- नांदेड ७८ लाख ६२ हजार २७ लाख ६४ हजार
- अमरावती ३ लाख २६ हजार ४ लाख ५ हजार
- नागपूर ६ लाख ९२ हजार ४ लाख ११ हजार
- एकूण ९ कोटी ५१ लाख ७९ हजार ५ कोटी १ लाख ५ हजार